ग्रामस्थांच्या निर्धारापुढे करोनाही हरला; विषाणूच्या दुसऱ्या लाटेला वेशीबाहेरचं रोखलं!

बंगळुरू – देशासाठी करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट अत्यंत घातक ठरली. रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्या होत्या. ठिकठिकाणी ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड्स तसेच करोना संबंधातील काही औषधांचा तुटवडा भासत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र देशातील बहुतांश ठिकाणी अशीच परिस्थिती असताना कर्नाटकातील एका गावात मात्र करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण आढळला नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील अल्लापूर या गावात विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण सापडला नाही. या यशामागे गावकऱ्यांनी करोना संबंधातील सर्व नियमांची केलेली काटेकोर अंमलबजावणी असल्याचं गावच्या कोव्हीड टास्क फोर्सचे प्रमुख मल्लिकार्जुन रुडर सांगतात.

“मी एक हॉटेल व्यावसायिक आहे. देशात व राज्यात विषाणू संसर्गाची दुसरी लाट थैमान घालत असताना आम्ही आमचं हॉटेल बंद ठेवलं होत. तसेच आम्ही शेजार-पाजारच्या गावांमध्ये देखील जात नव्हतो. एकमेकांशी बोलतानाही सोशल डिस्टंसिंगचे पालन करत होतो.” अशी माहिती ग्रामस्थ शिवलिंगप्पा अंगडी यांनी दिली.

करोना विषाणूचा आणखी नवा अवतार भारतामध्ये दाखल झाला असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. डेल्टा प्लस असे या विषाणूच्या नव्या अवताराचे नाव असून महाराष्ट्र, केरळ व मध्यप्रदेश या राज्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आलाय. असं असलं तरी विषाणू संबंधातील खबरदारीचे उपाय पाळल्यास करोनाला रोखणं शक्य आहे असं अल्लापूर येथील ग्रामस्थांनी सिद्ध केलंय.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.