करोनाचा धसका, मास्कचा तुटवडा

सॅनिटायझरलाही मागणी; सोशल मीडियावरही अफवांचे पीक


ग्रामीण भागात मात्र शांतता

पिंपरी – जगभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. भारतातही बाधित रुग्ण आढळल्याने पिंपरी चिंचवड शहरवासीयांनीही करोनाचा धसका घेतला आहे. एन 95 मास्कसाठी शहरवासीयांची धावाधाव सुरू असून, मागील दोन दिवसांत मास्कची किंमत दुपटीने वाढली आहे.

एन 95 मास्कबरोबरच साध्या मास्कला विशेष मागणी असल्याने विक्रत्यांकडून गैरफायदा घेतला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मात्र, मुंबईसह राज्यातील विविध शहरांत मास्कची मागणी जास्त असल्याने डीस्ट्रीब्यूटरर्स मास्कचा तुटवडा असल्याचे भासवत आहेत, असा दावा पिंपरी-चिचवडमधील औषधविक्रेत्यांनी केला आहे.

गेल्या तीन चार दिवसांपासून सोशल मीडियावर करोनाबाबत भीतीदायक मेसेज व्हायरल होत आहेत. तसेच लोणावळा परिसरात करोनाचे 4 रुग्ण आढळल्याची अफवा व पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयांत करोनाचे रुग्ण दाखल झाल्याच्या अफवेने पिंपरी चिंचवडकर भीतीच्या सावटाखाली आले आहेत. याचाच फायदा घेत शहरात आता मास्कचा गोरखधंदा सुरू झाला आहे. 150 रुपयांनी विकल्या जाणाऱ्या मास्कची किंमत आता 250 ते 300 रुपयांवर पोहोचली आहे. तर अनेक मेडिकल्स शॉपमध्ये एन 95 मास्कसह साध्या युज अँड थ्रो मास्कचा तुटवडा पहायला मिळत आहे.

अनेक ठिकाणी हिरव्या रंगाचा युज ऍण्ड थ्रो चा साधा 10 रुपयांना मिळणारा मास्क आता 40 ते 50 रुपयांना विकला जात आहे. 50 रुपये किमतीचा पिवळ्या रंगाचा मास्क 100 ते 120 रुपये, तर एन 95 मास्कची किंमत आता उपलब्ध झाल्यावर कदाचित 250 ते 300 रुपयांच्या घरात जाण्याची शक्‍यता दुकानदारांनी बोलून दाखवली आहे.

भारतात बेंगलुरू, मुंबई व दिल्ली या तीनच शहरांत एन 95 मास्कचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. मागणीच्या तुलनेत करोनाच्या भीतीने मास्क उत्पादन करणाऱ्या कंपन्या कमी आहेत. त्यामुळे शहरात मास्कचा तुटवडा जाणवत असून, प्रसंगी गरज पडल्यास बाहेरील शहरातून मास्क मागवावे लागतील, त्यामुळे मास्कच्या किमतीत आताच दुपटीने वाढ झाल्याचे शहरातील केमिस्टने सांगितले.

सोशल मीडियावर जनजागृती
एकीकडे मास्कचा तुटवडा जाणवत असून सोशल मीडियावर मात्र मास्क तयार करण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळत असून, अनेकांनी हे मास्क घरच्याघरीच बनविण्यास सुरुवात केली आहे. काहींनी हे मास्क इतरांनाही वाटप करत असल्याची माहिती दिली.

10 रुपयांचा मास्क 25 रुपयांना
सध्या साधा 10 रुपयांचा मास्क 25 रुपयांना विकत घ्यावा लागत आहे. दवाबाजारमध्ये मास्क उपलब्ध नसल्याचे होलसेल विक्रेते सांगत आहेत. आता बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांकडून अधिक मागणी होत आहे. 3 एन, 194, एन 95 या मास्कचा सध्या तुटवडा आहे. इतर शहरांत यापूर्वीच मास्क एक्‍पोर्ट झाल्याने शहरात सध्या तुटवडा जाणवत आहे.

उघड्यावर शिंकणे, खोकणे टाळावे. खोकताना, शिंकताना रूमाल, टिश्‍यू पेपरचा वापर करावा, आदी सूचनांमुळे आधीपासूनच अँटिबायोटिक्‍सची खरेदी करण्यात येत आहे. खासकरुन हिंजवडी व आयटी सेक्‍टरमधून सॅनिटायझर्सला अधिक मागणी आहे. भविष्यात ही मागणी अजून वाढेल. यासाठी मुंबईतील होलसेल विक्रेत्यांकडून मास्क मागविण्यात येत आहेत.
– संतोष पवार, श्री साई मेडिकल, हिंजवडी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.