कोरेगाव भीमात तंटामुक्‍ती निवडीवरूनच तंटा

संतप्त नागरिकांनी घेरल्यानंतर सरपंचांनी पाच मिनिटांत दिले तीन वेगवेगळे निर्णय

शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत चार जण इच्छुक होते. सरपंचांनी ग्रामसभेत देवीदास रोहिदास गव्हाणे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी प्रभाकर खलसे यांची निवड केली. मात्र यावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पोलिसांनी हस्तक्षेप केला तर ग्रामविकास अधिकारी भर सभेतून निघून गेले.

त्यानंतर सरपंचांना नागरिकांनी त्यांचा निर्णय बदलण्याबाबत ग्रामपंचायतीमध्ये घेराव घातल्यावर पाच मिनिटांत तीन वेगवेगळे निर्णय दिल्याने तणाव निर्माण झाला. कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच संगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. यावेळी उपसरपंच प्रकाश ढेरंगे, माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे, नितीन गव्हाणे, गणेश फडतरे, रमेश शिंदे, कल्पना गव्हाणे, पूजा भोकरे, शारदा गव्हाणे, आशा काशिद, मालन साळुंके, अंजली ढेरंगे, माजी सरपंच विजय गव्हाणे, अशोक काशिद, संदीप ढेरंगे, केशव फडतरे, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजेश माळी, सहायक उपनिरीक्षक अविनाश थोरात, अनिल कोळेकर, पोलीस नाईक ब्रम्हा पोवार, अविनाश पठारे, संतोष पवार, पोलीस पाटील मालन गव्हाणे व ग्रामस्थ तसेच महिला आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

अध्यक्षपदी देवीदास गव्हाणे, उपाध्यक्षपदी प्रभाकर खलसे

दरम्यान, तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदासाठी रवींद्र गव्हाणे, देविदास गव्हाणे, महादेव फडतरे, तानाजी ढेरंगे, कुंदा फडतरे आदींनी अर्ज दाखल केले होते. यावेळी सरपंच संगिता कांबळे यांनी देवीदास गव्हाणे यांची तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी व उपाध्यक्ष पदी प्रभाकर खलसे यांची निवड केली असताना यावेळी मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला.

शिक्रापूर पोलिसांनी हस्तक्षेप करुन गर्दी दूर केली. दरम्यान ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस हे तेथून निघून गेल्याने तणाव अधिक निर्माण झाला. यावेळी सरपंच संगिता कांबळे यांना ग्रामस्थ व महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये निवड चुकीची असल्याबाबत घेराव घातला. यावेळी गावामध्ये प्लॅस्टीक बंदी, विनापरवाना फ्लेक्‍स लावल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचा निर्णय घेत बेकायदा फ्लेक्‍सवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे सांगत ज्या इमारतींवर होर्डिंग लावलेले आहेत, त्या इमारतीची बांधकाम तपासणी करण्याची मागणी करण्यात आली.

सन 2019-2020साठी 8 कोटी 96 लाख 65 हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केलेले असून 73 बाबींचा समावेश केला आहे. मागील वर्षात ग्रामपंचायतीने आरोग्यासाठी 17 ते 18 लाख रुपये खर्च करूनही गावात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूची साथ पसरूनही ग्रामपंचायतीने गांभीर्याने दखल न घेतल्याने माजी सरपंच विजय गव्हाणे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी ग्रामपंचायत जवळील आठवडे बाजार नवीन बाजार तळावर हलविण्यावर निर्णय घेण्यात आला.

निवडीबाबत गावात संभ्रम
सरपंच संगिता कांबळे यांना ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात आपला निर्णय चुकीचा असल्याबाबत धारेवर धरल्यावर त्यांनी प्रथम अध्यक्षपदी महादेव फडतरे व उपाध्यक्षपदी कुंदा फडतरे यांची निवड केली. नंतर एक तासांत श्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगताच निर्णय आता घ्या असा दबाव आणल्यावर निवड थोडे दिवस स्थगित केली; मात्र गोंधळ कायम असतानाच पुन्हा निवड बरखास्त करण्याचा निर्णय सांगितल्याने निवडीबाबत संभ्रम निर्माण झाला असून गावात वाद निर्माण झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.