टंकलेखन परीक्षेतही कॉपी प्रकरणे!

137 प्रकरणांवर 22 एप्रिल रोजी होणार सुनावणी
 
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या टंकलेखन परीक्षेत 137 कॉपीची प्रकरणे आढळून आली आहेत. या प्रकरणावर परीक्षार्थी व केंद्रसंचालक यांची येत्या 22 एप्रिल रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.

परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी राज्यातील सर्व विभागात टंकलेखनाच्या परीक्षा घेण्यात येतात. यात गेल्या परीक्षत कॉपीची बरीच प्रकरणे आढळून आली आहेत. डमी उमेदवाराला परीक्षेला बसविणे, परीक्षेच्या वेळी एकमेकांना उत्तरे विचारणे, गप्पा मारणे यासारख्या गैरमार्गाचा अवलंब परीक्षार्थींकडून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यात अमरावती विभागात सर्वाधिक 45 कॉपीची प्रकरणे सापडली आहेत. नाशिकमध्ये 30, औरंगाबादमध्ये 26, नागपूरला 14, लातूरला 10, कोल्हापूरमध्ये 5, पुण्यात 4, मुंबईमध्ये 3 याप्रमाणे विविध विभागांमध्ये कॉपीची प्रकरणे सापडली आहेत.

या प्रकरणातील परीक्षार्थी व केंद्रसंचालक यांची एकदा चौकशी करुन सुनावणी घेण्यात आली आहे. मात्र यात समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. यामुळे आता पुन्हा दुसऱ्यांदा सुनावणीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठीचे वेळापत्रकही परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार सकाळी 11 वाजता आवश्‍यक कागदपत्रासह चौकशीला परीक्षा परिषदेच्या कार्यालयात उपस्थित राहवे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिल्या आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.