पुणे : एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी असणाऱ्या संबंधांच्या आरोपावरून अटक केलेले तेलगू कवी वरवरा राव यांच्या जप्त केलेल्या पण खराब झालेल्या हार्डडिस्कमधील माहिती मिळवण्यासाठी अमेरिकन गुप्तचर यंत्रणा एफबीआयची मदत घेण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.
राव यांच्या निवास्थानावर ऑगस्ट 2018मध्ये छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी ही हार्ड डिस्क जप्त करण्यात आली. या हार्ड डिस्कमधून माहिती मिळवण्याचे पुणे येथील न्यावैद्यकीय प्रयोगशाळेत प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यात यश आले नाही. त्यानंतर ती मूंबई येथील न्यायवैद्यक संचलनालयात पाठवण्यात आली. तेथून गुजरात आणि हैदराबाद येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत त्याबाबतचे प्रयत्न झाले. मात्र त्यातही यश आले नाही.
एफबीआयची प्रयोगशाळा सर्वात अद्ययावत असल्याने ही हार्ड डिस्क तेथे पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आवश्यक ती परवानगी आणि मंजुरी घेण्यात येईल,असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या खटल्याशी संबंधित नऊ कार्यकर्त्यांसह 19 जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. वरवरा राव, सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन, अरूण फरेरा, वर्नन गोन्साल्वीस आणि सुधा भारद्वाज यांचा त्यात समावेश होता.
31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेतील भडक भाषणांमुळे दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगाव येथील दंगल उसळली असा पोलिसांचा आरोप आहे.