पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्र व एम ए एस फियनांशियल सर्व्हिसेस यांच्यामध्ये कर्ज वितरण करण्यासाठी व्यूहात्मक सहकार्य करार झाला आहे. रिझर्व बॅंकेच्या नियमांच्या अधिन राहून मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योजकांना सदर व्यूहात्मक कर्ज वितरण व्यवस्थेत कर्ज वितरण अभिप्रेत आहे.
बॅंक ऑफ महाराष्ट्र व एम ए एस फियनांशियल सर्व्हिसेस या दोन्ही संस्थांच्या सदर कर्ज वितरण व्यवस्थेतील सहभागामुळे त्यांच्या कर्ज खात्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होईल.
सहभागी कर्ज वितरणाची संकल्पना मूळ धरत असून त्यामुळे मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योजकांना कर्ज वितरण करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल होतील, असा अभिप्राय बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव यांनी व्यक्त केला.
फिनटेक कंपन्यांशी भागीदारी वाढविण्यास बॅंक ऑफ महाराष्ट्र कटिबद्ध असल्याचे कार्यकारी संचालक ए. बी. विजयकुमार यांनी सांगितले. एम ए एस फियनांशियल सर्व्हिसेस ही रिझर्व बॅंक नियमित बिगर बॅंकिंग वित्तीय कंपनी असून त्यांच्या शाखांचे जाळे संपूर्ण भारतात आहे.