अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांचे नागरिकांना शांततेचे आवाहन
तळेगाव ढमढेरे – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे 1 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाला शांतता राखण्यासाठी परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन बारामती झोनचे अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी नागरिकांना केले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील सावतामाळी मंगल कार्यालयात नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार आणि बारामती झोनचे अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी येथील नागरिकांनी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना शांततेत आणि सुरक्षिततेत कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी केली.
कोरेगाव येथे येणाऱ्या भक्तांसाठी गेल्यावर्षी पेक्षा अधिक सोयसुविधा देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, तसेच अनुयायांना बसची सुविधा पुरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तळेगाव ढमढेरेसह मोठ्या गावांमध्ये जातीय सलोखा अबाधित ठेऊन नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विश्वास ढमढेरे, माजी पंचायत समिती सभापती आरती भुजबळ, शिरूर तालुका आरपीआय अध्यक्ष नवनाथ कांबळे, पोलीस पाटील पांडुरंग नरके, सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी माजी उपसरपंच राकेश भुजबळ, नवनाथ ढमढेरे, शहाजी ढमढेरे, ग्रा.सदस्य प्रमोद ढवळे, हनुमंत भुजबळ यासह ग्रामस्थ उपस्थित होते.