स्वयंपाक – एक उत्तम कला

पुणे – वर्षानुवर्षे स्त्रिया स्वयंपाकघरात रमलेल्या दिसतात. घरातलं “स्वयंपाकघर’ हे खरं स्त्रीचं राज्य असतं. पूर्वीच्या काळातील स्त्रियांच्या “चूल आणि मूल’ या परिघातून, आजची स्त्री बाहेर पडली असली तरी अर्थाजर्नाबरोबर तिला या दुहेरी कसरतीला सतत समोरे जावे लागते. बाहेर उच्च पदावर काम करताना, विविध क्षेत्रे काबीज करताना, अनेक आव्हानांना तोंड देताना, स्त्रीच्या मनात तिच्या घराबद्दलची ओढ नेहमी कायम असते आणि स्वयंपाकघरात ती आजही तितकीच रमते. आता स्वयंपाकघरे सुसज्ज झाली आहेत.

आधुनिक उपकरणांनी कष्ट कमी झाले आहेत. पण रोजचा स्वयंपाक करण्यासाठी उत्तम नियोजन हे घरात करावेच लागते. पोळी करण्यासाठी बाई ठेवता येते, पण त्यासाठी बाजारातून गहू दळून किंवा तयार आटा तरी आणावाच लागतो. तेल, तवा, परात, पोळपाट, लाटणे या वस्तू जागेवर हव्यात. साधी भाजी करायची तर ती आधी बाजारातून आणावी लागते. मग ती धुवा, चिरा त्यासाठी लागणारे तिखट, मीठ, मसाला, गूळ याची तयारी असावी लागते.

दररोज लागणाऱ्या फक्‍त पोळी-भाजीसाठी किती तरी तयारी, सामग्री जमवावी लागते. “तू घरातच असतेस’ तर एखादी गोष्ट झाली नाही तर स्त्रिला टोकावे लागते. पण एखाद्या छोट्या गोष्टीसाठी तिला किती नियोजन करावे लागते, हे इतरांना समजत नाही.

रोजच्या स्वयंपाकाबरोबर सणवार, पाहुणे, इतर कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या भोजन समारंभासाठी घरातील गृहिणीला फार आधीपासून तयारी करावी लागते. पाहुणे जेवायला येणार असल्यास, त्यांच्या साधारण आवडी निवडी, त्यांचा वयोगट बघूनच जेवणाचा मेनू ठरवावा लागतो. त्यानुसार सामानाची जमवाजमव करणे, घर आवरणे, टेबलावरील वस्तूंची मांडणी करणे याची पूर्वतयारी करावी लागते. मग प्रत्यक्ष स्वयंपाक करणे, पाहुण्यांशी बोलणे आणि त्यांना आनंदाने खाऊ घालणे या सर्वांकरिता खूप कष्ट आणि नियोजन लागते.

बाकी सर्व नियोजन, आराखडा, घराची मांडणी नुसती चांगली असून भागत नाही प्रत्यक्ष पदार्थ हे रूचकर बनवावे लागतात. म्हणूनच म्हणते स्वयंपाकासाठी फक्‍त नियोजनच नाही तर उत्तम स्वयंपाक येणे ही सुद्धा एक कला आहे.

संगीत, नृत्य, चित्रकला, वादन आणि इतर कोणत्याही कलेसाठी जशी साधना लागते तशी “स्वयंपाक’ ही कला येण्यासाठी वर्षानुवर्षे स्त्रिया राबत असतात. जेव्हा स्त्रिया आपल्या लग्नाची 40 किंवा 50 वर्षे पूर्ण करताना दिसतात तेव्हा खरंच त्यांना सलाम करावासा वाटतो. अखंड इतकी वर्षे दररोज न चुकता एखादी गोष्ट करणे खरेच सोपे नाही. नोकरीत तरी रिटायरमेंट असते. पण स्वयंपाकघरातून नाही.

पण एखादी स्त्री हे सर्व आनंदाने करीत असते ते आपल्या कुटुंबासाठी. त्या कुटुंबातील व्यक्‍तींनी तिच्या या योगदानाची थोडी जाणीव जरी ठेवली तरी समाधानाने तृप्त होते. तिला फक्‍त त्यासाठी दोन गोड शब्दांची अपेक्षा असते. कारण हा संसार तिने मनाने स्वीकारलेला असतो. म्हणूनच “बहिणाबाई चौधरी’ या एका स्त्रीनेच समस्त स्त्रियांसाठी संसाराचे वर्णन केले आहे ना –
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर.

– आरती मोने

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.