निर्भया प्रकरणातील दोषींना कुटुंबियांना भेटण्याची परवानगी
नवी दिल्ली : देशातील सर्वात घृणास्पद ठरलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या फाशीचा दिवस जवळ येत असल्याने या नराधमांना त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. फासावर लटकवण्यापुर्वी त्यांना कुटुंबियांना भेटण्याची दोनदा परवानगी देण्यात येईल, असे तिहार कारागृहातील सूत्रांनी सांगितले.
फाशी ठोठावलेल्यांपैकी विनय शर्मा त्याच्या वडीलांना भेटला. नियम न पाळल्याबद्दल त्याला तिहारमध्ये सर्वाधिक वेळा शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुकेशची आई त्याला भेटत असते. दोनच दिवसांपुर्वी त्याच्या आईने त्याची भेट घेतली. पवन गुप्ता याच्या कुटुंबियांनी सात जानेवारीला त्याची भेट घेतली. पण अक्षयकुमार याची पत्नी त्याला भेटण्यासाठी नोव्हेंबरमध्ये आली होती. त्यानंतर त्याच्या कुटूंबियापैकी कोणीही त्याला भेटण्यासाठी आले नाही. मात्र तो आपल्या पत्नीशी दूरध्वनीवर नेहमी संवाद साधतो, असे कारागृहातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
या दोषींना त्यांच्या कुटुंबियांना भेटायचे असेल तर भेटू शकतात, असे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या पैकी कोणीही त्याला अद्याप प्रतिसाद दिला नाही. जर यातील आरोपींनी प्रतिसाद दिला नाही तर आरोपींना शेवटची संधी फाशीच्या आधी दोन दिवस म्हणजे 20 जानेवारीला देण्यात येईल.
दरम्यान मिरतहून पवन जल्लाद हा 20जानेवारीला तिहारमध्ये येईल. तो कारागृहाच्या आवारात राहील. प्रत्येक फाशीसाठी त्यांना 15 हजार रुपये मानधन देण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.