नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिक इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीकडे वळत आहेत. मात्र इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती अधिक आहेत. तर काहींकडे आधीच पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी आहेत. मात्र आता जुन्या वाहनाचं रुपांतर तुम्ही इलेक्ट्रीक बाईकमध्ये करू शकता.
इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी या उद्योगांशी संबंधीत स्टार्टअप्सला मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्यात येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात स्टार्टअप सुरू होत आहे. बंगळुरू स्थित राईड-शेअरींग स्टार्टअप कंपनी बाउन्सने जुन्या स्कूटरचं रुपांतर इलेक्ट्रीकमध्ये करण्यास सुरुवात केली आहे.
कंपनी कोणत्याही पेट्रोल इंजिन स्कूटरला इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी बसवून इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतरित करते. यासाठी कंपनी फक्त 20 हजार रुपये घेते. बाउन्सने आतापर्यंत एक हजाराहून अधिक जुन्या स्कूटरचे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतर केले आहे.
कंपनी जुन्या स्कूटरमध्ये एक रेट्रोफिट किट ठेवते ज्यात इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी समाविष्ट असते. स्कूटरमध्ये बसवलेली बॅटरी किट एका चार्जवर 65 किमी पर्यंत चालते. हे किट ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे प्रमाणित आहे.
कंपनीने पायलट प्रोजेक्ट स्वरूपात जुन्या पारंपरिक स्कूटरला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतरित करण्यास सुरुवात केल्याचे बाऊन्सचे सह-संस्थापक विवेकानंद हल्लेकरे सांगितले. आता इतर कंपन्या देखील जुन्या स्कूटरचे रुपांतर इलेक्ट्रीक स्कुटरमध्ये करत आहेत.
दरम्यान अल्टीयस ऑटो सोल्युशन्स कंपनीचे संस्थापक राजीव अरोरा यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम बॅटरीची किंमत 13 ते 15 हजार प्रति किलोवॅट आहे. त्याचबरोबर सरकार प्रति किलोवॅट 15,000 रुपयांपर्यंत अनुदान देत आहे. यामुळे उत्पादकांना प्रति किलोवॅट 2,000 रुपयांची बचत होते.