अधिवेशनाचे कामकाज आज गुंडाळणार

राज्याची विकासयात्रा अखंडित ठेवणार – मुख्यमंत्री

शेती-सिंचन, आरोग्य, महिला व बाल विकास या क्षेत्रांसह प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या लोककल्याणकारी उपक्रमांसाठी भरीव तरतूद करुन राज्याची विकासयात्रा अखंडित ठेवण्याचा निर्धार आज सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात व्यक्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. देशातील आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 2019-20 या वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. पुढील अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईपर्यंत आवश्‍यक असणाछया खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच शेतकरी, मजूर, महिला, बालके आणि वंचित-उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने गेल्या चार वर्षात सुरु केलेल्या लोककल्याणकारी योजना-उपक्रमांसाठी भरीव तरतूद केली गेली आहे. शेती व शेतीपूरक व्यवसाय, उद्योग व रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा, ग्रामविकास, कौशल्य विकास या कार्यक्रमांबरोबरच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी या अर्थसंकल्पातील तरतुदी सहाय्यभूत ठरणार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना नैराश्‍याच्या खाईत ढकलणारा अर्थसंकल्प! – विखे-पाटील 
भाजप-शिवसेना सरकारने मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प दुष्काळग्रस्तांना नैराश्‍याच्या खाईत ढकलणारा असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रूपये थेट आर्थिक मदत देण्याची गरज होती. खरीप 2018 पर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची आवश्‍यकता होती. परंतु, यासंदर्भात सरकारने काहीही घोषणा न केल्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात “अन्नदाता सुखी भव’चा उल्लेख केला. पण आजवर या सरकारचे धोरण “अन्नदाता दुःखी भव’ असेच असल्याचा ठपका विरोधी पक्षनेत्यांनी ठेवला. हे सरकार प्रत्येक अर्थसंकल्पात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा उल्लेख करते. पण मागील साडेचार वर्षात या दोन्ही स्मारकांची एकही वीट का लागली नाही, असा सवालही विखे-पाटील यांनी उपस्थित केला. शिवस्मारकाच्या सर्व परवानग्या मिळाल्याचा सरकारचा दावा साफ खोटा आहे. सर्व परवानग्या मिळाल्या असत्या तर उच्च न्यायालयाने स्मारकाच्या कामाला स्थगिती दिली नसती, असेही ते म्हणाले.

जनतेच्या हातात वाटाण्याच्या अक्षता देणारा अर्थसंकल्प – जयंत पाटील 
भाजप सरकारने सादर केलेला अर्थ संकल्प म्हणजे जनतेच्या हातात वाटाण्याच्या अक्षता देण्याचा प्रकार असून राज्यातील सर्व वर्गांना निराश करणारा आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला. अर्थसंकल्पात योजना प्रस्तावित करणे अपेक्षित असते, मात्र अर्थमंत्र्यांनी भाषणाचा सारा वेळ केवळ सरकारने केलेल्या कामांची यादी वाचण्यात घालवला. एकंदरच हा अर्थसंकल्प न राहता जनतेच्या नजरेत पुन्हा एकदा येण्याची एक केविलवाणी कृती होती असे पाटील म्हणाले.

जुन्याच घोषणांचा सुकाळ व अंमलबजावणीचा दुष्काळ – मुंडे 
वस्तूस्थितीशी फारकत असलेला, आकड्यांची फेरफार करुन सादर केलेला “व्यर्थ’संकल्प आहे. जुन्याच घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीच दुष्काळ असलेला हा अर्थसंकल्प आहे. यातून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि जनतेच्या हालअपेष्टा जराही कमी होणार नाहीत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतच्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या असल्याचे वित्तमंत्र्यांनी धडधडीत खोटे सांगितले. शिवरायांच्या स्मारकाला सर्व परवानग्या प्राप्त आहेत तर पंतप्रधानांनी जलपूजन केल्यानंतरही दोन वर्षे हे काम का रखडले आणि सर्वोच्च न्यायालयाने या कामाला स्थगिती का दिली, असा सवालही मुंडे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)