मुलांच्या नावाने बँक खाते उघडण्याची सुविधा (भाग-१)
खर्चाची मर्यादा
दिवसाला किंवा वर्षाला किती रक्कम खर्च करण्याची मर्यादा आहे याची चौकशी बँकेच्या शाखेत करा. अनेक बँकांमध्ये दिवसाला एक हजार ते अडीच हजार रुपये खर्च करण्याची मर्यादा असते तर काही बँकांमध्ये ही मर्यादा पाच हजार रुपयांपर्यंत असते.
चेकबुक
अनेकदा खात्याबरोबरच वैयक्तिक नावासह चेकबुक मिळते. त्यातून चेक कसा लिहायचा आणि बँकेत भरायचा याची प्रत्यक्ष माहिती मुलांना मिळू शकते. त्याचबरोबर पासबुकात किंवा मंथली स्टेटमेंटमध्ये त्याची एंट्री कशी होते हे मुलांना समजेल.
केवायसी
दहा वर्षाखालील मुलाचे खाते उघडायचे असेल तर मुलाच्या जन्म तारखेचा पुरावा आणि पालकांचे आधार कार्ड आणि पॅनकार्ड लागते. अन्यथा मुलाच्या जन्मतारखेचा पुरावा आणि त्याचे आधार कार्ड पुरेसे ठरते.
काय करावे?
बँक खात्याची सुरक्षा, एटीएम कार्डची सुरक्षा, पासवर्ड या सगळे कसे हाताळायचे, पैशाचे महत्त्व, मोबाईल ओटीपी, एटीएमचा पिन नंबर हे सगळे मुलांना माहित होणे आवश्यक असते. मुलाच्या नावाने बँक खाते काढल्यामुळे स्वतःचे खाते ही भावना मुलांच्या मनात तयार होते आणि सगळ्या गोष्टी त्यांनी पुढाकार घेऊन केल्याने त्यांना बँकिंग व्यवहारांची माहिती होत जाते. मुले स्वतंत्रपणे खाते चालवू लागतात. फक्त पालकांनी त्यावर बारकाईने लक्ष ठेवावे लागते. अर्थात मुलांच्या खर्च करण्याच्या सवयी देखील पालकांना कळतात. त्यामुळे मुलांच्या नावाने बँक अकाऊंट उघडणे ही एक चांगली संधी ठरू शकते.
– चतुर