युपीएससीच्या मुख्य परिक्षेतील सेक्‍युलॅरिझमच्या प्रश्‍नावरून वादंग

नवी दिल्ली: आयएएस, आयपीएस आणि आएफएस या महत्वाच्या परिक्षेतील काल घेण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील परिक्षेत सेक्‍युलॅरिझम विषयी विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नामुळे मोठेच वादंग निर्माण झाले आहे. सेक्‍युलॅरिझमच्या दुराग्रहामुळे भारतातील सांस्कृतीक प्रथांपुढे कोणत्या स्वरूपाची आव्हाने निर्माण होतात असा प्रश्‍न या परिक्षेत विचारण्यात आला होता. त्याला अनेक परिक्षार्थींनी आक्षेप घेतला आहे.

अशा स्वरूपाचे प्रश्‍न विचारणे म्हणजे नोकरशाहींचे संघीयकरण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका अनेक परिक्षार्थींनी ट्विटरवर केली आहे. विविध विषयांवरील परिक्षार्थींचे सर्वसामान्य आकलन जाणून घेण्यासाठीच्या या प्रश्‍न पत्रिकेत हा प्रश्‍न विचारण्यात आला होता. भारतीय समाजाची सांस्कृतिकता कशामुळे टिकून आहे, राष्ट्रीयत्वाची ओळख टिकवण्यासाठी भारतीयत्वाविषयीचे प्रबोधन ही महत्वाची ठरत आहे काय अशा अनुषंगानेही या प्रश्‍न पत्रिकेत प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. युपीएससीची ही मुख्य परिक्षा 20 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत घेतली जात आहे. कालच्या परिक्षेत हे प्रश्‍न विचारण्यात आले होते. या वर्षीच्या मुख्य परिक्षेसाठी देशभरातून एकूण 11 हजार 885 परिक्षार्थी पात्र ठरले आहेत. त्यातून 900 उमेदवार निवडले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)