रत्नागिरी : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही सुटलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्र्यांची घोषणा केली होती. त्यात रायगडचे पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना दिले होते. त्यानंतर जिल्ह्यात शिंदेसेनेचे आमदार नाराज झाले होते. मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रास्ता रोको केला होता. काही ठिकाणी जाळपोळही झाली होती.
आदिती तटकरे यांना विरोध करण्यात आला होता. वाढता विरोध लक्षात घेता रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती. तेव्हा पासून आजपर्यंत पालकमंत्र्याची नियुक्ती झालेली नाही. मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याने हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
मंत्री भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहे. त्यामुळे त्यांनी या पदावर दावा केला होता. असं असतानाही आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री केले गेले. पुढे मात्र त्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. त्या आधी रायगडचे पालकमंत्रिपद हे शिवसेनेच्या उदय सामंत यांच्याकडे होते. त्यांनी आता रायगडचे पालकमंत्री कोण होणार हे आधीच ठरले होते. याबाबतचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
त्यामुळे महायुतीत रायगड पालकमंत्रिपदावरून वाद होण्याची शक्यता आहे. मी अडीच वर्षे रायगडचा पालकमंत्री होतो. भरतशेठ गोगावले तेव्हा मंत्री झाले नव्हते. म्हणून ती जबाबदारी त्यावेळी माझ्यावर होती.पण जेव्हा भरतशेठ पुन्हा निवडून येतील तेव्हा ते तिथे पालकमंत्री होतील, असे तिन्ही पक्षांमध्ये ठरलेले होते, असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे भरत गोगावलेच पालकमंत्री व्हावेत असे आम्हा सर्वांचे म्हणणे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.