सर्व प्रभागांमध्ये समान कामे व्हावी : स्थायी समिती सदस्यांची मागणी
पिंपरी – वाकडमधील (प्रभाग क्रमांक 25) कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा त्याऐवजी डांबरीकरण करावे. आयुक्तांनी राज्य सरकारला अपूर्ण माहिती दिली आहे. सर्व प्रभागांमध्ये समान विकासकामे व्हायला हवी. असा मुद्दा बुधवारी (दि. 23) स्थायी समिती सभेत काही सदस्यांनी लावून धरला. त्यावरून वादंग झाले.
महापौर उषा ढोरे यांनी देखील याबाबत आयुक्तांनी शासनाला दिलेला खोटा व दिशाभूल करणारा अहवाल फेटाळण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. वाकडमधील दोन कॉंक्रीट रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर निविदेनुसार 30 कोटी तर, ताथवडे येथील रस्ता, सांडपाणी नलिका, स्ट्रॉम वॉटर लाइन आदींसाठी 20 कोटी रुपयांची कामे काढण्यात आली आहेत. आयुक्तांनी या कामांबाबत राज्य सरकारला दिलेली माहिती अपूर्ण आहे.
एकाच प्रभागामध्ये कोट्यावधी रुपयांच्या कामे करण्यापेक्षा सर्व प्रभागांमध्ये समान कामे व्हायला हवी. प्रत्येक वॉर्डांमध्ये विकासकामे होणे गरजेचे आहे. वाकडमधील कॉंक्रीटीकरणाची कामे खूप खर्चिक असल्याने त्याऐवजी डांबरीकरणाची फेरनिविदा काढण्यात यावी, असा आदेश स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांनी यापूर्वी झालेल्या स्थायी समिती सभेत दिले होते, असे विविध मुद्दे स्थायी समिती सदस्य अभिषेक बारणे, शशिकांत कदम यांनी सभेमध्ये उपस्थित केले.
सदस्यांचा आक्षेप लक्षात घेता याबाबत पूर्ण माहिती घेऊन राज्य सरकारला अहवाल पाठविण्यात येईल. अहवालात खरच चूक झाली आहे का, याची तपासणी केली जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सभेत सांगितले.
आयुक्तांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप
वाकडमधील कॉंक्रीटीकरणाच्या कामांबाबत महापालिका आयुक्तांनी नगरविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांना पाठविलेल्या अहवालात कोणतेही कारण न देता हा विषय दफ्तरी दाखल केल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप महापौर उषा ढोरे यांनी केला आहे. आयुक्तांनी शासनाची दिशाभूल केली असल्याचे देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. हा अहवाल फेटाळण्यात यावा. एकाच प्रभागामध्ये (प्रभाग 25) शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त कामे काढण्यात आली आहेत, असेही महापौरांनी म्हटले आहे.