मुंबई – राज्यभरात सध्या नृत्यांगना गौतमी पाटीलची चर्चा आहे. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. यामुळे आता गौतमी आणि कार्यक्रमात राडा हे जणू समीकरणच बनत चाललं आहे. यामुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. यातच आता पुन्हा एकदा गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
आता हा वाद निर्माण झाला तो म्हणजे गौतमीच्या आडनावावरून.. गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून तिने तिचे खरे आडनाव लपून ठेवल्याचा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. “गौतमीचे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव वापरून तिने पाटलांची बदनामी केली. गौतमीने पाटील हे आडनाव वापरु नये, अन्यथा तिचे कार्यक्रम राज्यात चालू देणार नाही,” असा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला आहे.
यावर गौतमी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज गुरुवारी सायंकाळी ७ वाजता विरारमध्ये गौतमीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमावेळी गौतमी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर पाटील या आडनावावरून झालेल्या वादावर ती काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष राहणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्यातील छोटा पुढारी म्हणून नावारूपाला आलेला घनश्याम दराडे यांनी गौतमी पाटीलवर निशाणा साधला होता. गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार करू नये, आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा छोटा पुढारी घनश्याम दराडेने दिला होता. यावर आता गौतमीने ‘मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत, असे प्रत्युत्तर दिले होते.