वाराणसी – पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत हिंदू नसणाऱ्यांना गंगा घाटावर प्रवेश दिला जाणार नाही, असा इशारा देणारे पोस्टर्स संपूर्ण वाराणसीमध्ये झळकले आहेत. या पोस्टर्समुळे खळबळ उडाली असून सोशल मीडियावर हे पोस्टर्स व्हायरल होताच ते काढण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे.
हे पोस्टर्स विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या पोस्टर्सवर या दोन्ही संस्थांची नावं देखील टाकण्यात आली असून हिंदू नसणाऱ्यांना प्रवेश नसल्याचा मथळा पोस्टर्सवर आहे. हिंदी भाषेत हे पोस्टर्स लिहिण्यात आले आहेत.
हिंदू नसणाऱ्यांना प्रवेश नाही. गंगा माता, काशीचे घाट आणि मंदिर हे सनातन धर्म, भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि आस्थेचे प्रतीक आहेत. ज्यांची सनातन धर्मावर श्रद्धा आहे, त्यांचे इथे स्वागत आहे. नाहीतर हे ठिकाण पिकनिक स्पॉट नाही, असे या पोस्टरवर लिहिले आहे.
यासंदर्भात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे वाराणसी पोलिसांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून त्यासंदर्भात तपास सुरू केला आहे. स्थानिक भेलुपूर पोलीस स्थानकामार्फत याची चौकशी सुरू आहे. हे पोस्टर्स लावतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. स्थानिकांच्या मदतीने हे पोस्टर्स काढले जात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.