नवी दिल्ली – सुल्ली डील्स नावाचे एक वादग्रस्त ऍप बनवणाऱ्या तरूणास दिल्ली पोलिसांनी मध्यप्रदेशातील इंदूरमधून अटक केली. या ऍपच्या प्रकरणात ही पहिलीच अटक आहे. याही ऍपवर शेकडो मुस्लिम महिला लिलावात उपलब्ध असल्याचे भासवण्यात आले होते. त्यासाठी ऍपच्या निर्मात्याने अनेक मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या अनुमती शिवाय वापरले होते. त्यातून मुस्लिम महिलांची बदनामी करण्याचा प्रकार झाला होता.
या प्रकरणात मध्यप्रदेशात अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव ओंकारेश्वर ठाकूर असून तो 26 वर्षीय तरूण बीसीए चा पदवीधर आहे. या युवकाने आपला गुन्हा कबुल केला असून मुस्लिम महिलांची मोठ्या प्रमाणावर बदनामी करणाऱ्या ग्रुपसाठी आपण काम करीत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याने स्वता आपल्या ट्विटर अकौंटवर या ऍपची लिंक लोकांसाठी टाकली होती. त्यातून त्याने ऍपचा मोठ्या प्रमाणात प्रसार केला होता.