मुंबई : महाराष्ट्रात विद्यासागर राव यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्याच्या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली. भाजप-शिवसेनेचे सरकार राज्यात असताना भगत सिंग कोश्यारींची एन्ट्री झाली. संघाचा हार्डकोअर स्वयंसेवक ते भाजपकडून उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिलेले भगतसिंह कोश्यारी आल्यापासून चर्चेत राहिले. याची बरीच कारणंही आहेत. त्यांच्या याच चर्चेत राहण्याच्या विषयावर थोडक्यात नजर टाकूया…
राज्यात राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या अन् महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सत्तेत आले. आणि इथूनच सरकार विरुद्ध राज्यपाल असा खरा संघर्ष सुरु झाला. याला राजकीय कारणं बरीच असली तरी यात महत्वाचा मुद्दा राहिला राज्यपालांची सातत्याने येणारी वादग्रस्त वक्तव्यं. महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वात चर्चित ठरलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे अखेर राजीनामा देण्याच्या मूडमध्ये आहेत असं दिसतंय. त्याचं कारण आहे राज्यपालांनी पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केलेली राजीनाम्याची इच्छा.
राज्यपाल कोश्यारींनी केलेलीवादग्रस्त वक्तव्यं…
* सर्वात आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत बोलताना मुंबई-ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गार काढताना मुंबई-ठाण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही, असे राज्यपाल म्हणाले आणि संतापाची लाट उसळली.
* यानंतर त्यांनी समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने पुन्हा अडचणीत आले. “चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं, तसंच छत्रपतींनी मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे, असं समर्थांना म्हटलं,” अशा आशयाचे वक्तव्य कोश्यारींनी केले होते.
* पुण्यातील एका कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत हसत हसत केलेल्या एका वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता. त्यांनी म्हटलं होतं की, “कल्पना करा की सावित्रीबाईंचं लग्न 10 वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे 13 वर्ष होतं. कल्पना करा की मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील? असं ते हसत हसत म्हणाले आणि टीकेचे धनी झाले.
* राज्यपाल कोश्यारींनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला, असं वक्तव्य करुन पुन्हा वाद ओढावून घेतला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. पण त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. ते शांतीदूत आहेत असं त्यांना नेहमी वाटायचं. देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. पण त्यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ पुढे सुरू होतं, असे राज्यपाल म्हणाले आणि त्यावरूनही प्रचंड वादंग निर्माण झाला.
* काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात राज्यपाल कोश्यारी सहभागी झाले. यावेळी त्यांनी नितीन गडकरींची स्तुती करण्याच्या नादात पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी म्हटलं की, मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. भीमराव आंबेडकरा यांच्यापासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले. यानंतर राज्यपालांच्या विरोधात राज्यभर आंदोलने झाली.
* लॉकडाऊनमध्ये मंदिरे पुन्हा खुली करण्यावरुन वाद, विमानाच्या उड्डाणाला परवानगी न दिल्याने वाद, 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन वाद, कुलगुरुंच्या नियुक्तीच्या अधिकारांवरुन वाद, अभिनेत्री कंगनाला भेटीची वेळ दिल्याने वाद असे एक नाही अनेक वाद राज्यपालांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राने पाहिले.