अमरावती : बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाखाचे बक्षीस देणार असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यादरम्यान आता भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी देखील राहुल गांधी यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले अनिल बोंडे?
‘संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाहीये. परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची जीभ छाटू नये जिभेला चटके मात्र दिले पाहिजे अशा लोकांना जिभेला चटके देणे आवश्यक आहे.’ असे वक्तव्य केले आहे.
यावेळी डॉ.अनिल बोंडे यांनी राहुल गांधी, ज्ञानेश महाराव असो अथवा श्याम मानव असोत कुणीही असो, असे म्हणत ज्ञानेश महाराव, श्याम मानव यांच्यावरही यावेळी टीका केली. डॉ.अनिल बोंडे त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.