प्रचारवरून रिपाइं आठवले गटात वादाची ठिणगी

पिंपरी  – लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यावर रामदास आठवले यांनी शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, नेमका कोणाच्या आदेशावरून प्रचारात सहभागी व्हायचे? यावरून रिपाइं आठवले गटात वादाची ठिणगी पडली आहे. आठवलेंचा आदेश न मानण्याचे वक्‍तव्य करणारे भाजप कोट्यातील रिपाइंचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी रिपाइंचे प्रदेश सचिव बाळासाहेब भागवत यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप-रिपाइंची युती होती. या युतीमुळे बाळासाहेब ओव्हाळ हे भाजपच्या निवडणुक चिन्हावर निवडून आले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत आमदार लक्षमण जगताप सांगतील, त्या उमेदवाराचे काम करू, रामदास आठवले यांच्या राजकीय भूमिकेशी माझा कुठलाही संबंध असणार नाही, या ओव्हाळ यांच्या वक्‍तव्याला बाळासाहेब भागवत यांन अिाक्षेप घेतला आहे. ओव्हाळ यांची कोणतीही ओळख नसताना युतीमुळे ओव्हाळ यांना रिपाइंच्या आठवले गटाच्या कोट्यातून भाजपची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आठवले साहेबांबाबत बोलण्यापुर्वी त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भागवत यांनी केली आहे.

राजीनामा मागणारे हे कोण ?

मी काही स्वीकृत नगरसेवक नाही. मी जनतेमधून निवडून आलो आहे. माझा राजीनामा मागायचा की नाही ते माझे मतदार ठरवतील.माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा मागणारे हे कोण? माझ्या पदाचा राजीनामा द्यायचा की नाही ते मी स्वत: ठरवीन.

– बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड मनपा

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.