करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी खासगी रुग्णालयांना पालिका आयुक्तांचे आदेश
पुणे – शहरातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने अखेर राज्यशासनाच्या आदेशानुसार 16 रुग्णालयांच्या 80 टक्के खाटा अखेर नियंत्रित केल्या आहेत.
याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी बुधवारी काढले. या निर्णयामुळे एकूण 1,786 खाटा उपलब्ध होणार आहेत. सोबतच सुमारे 85 व्हेंटिलेटर्सही उपलब्ध होतील.
शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील खासगी रुग्णालयांच्या 80 टक्के खाटा नियंत्रित करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यानुसार, या रुग्णालयांमध्ये करोनाबाधितांवर उपचार करणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे. या निर्णयानंतर महापालिकेकडून प्रमुख रुग्णालयांशी चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर पहिल्या टप्प्यात सुमारे 16 रुग्णालयांच्या खाटा नियंत्रित करण्यात आल्या आहेत.
या रुग्णालयांमध्ये 3,034 खाटा असून त्यात, प्रत्यक्ष वापरात 2,286 खाटा आहेत. यातील सुमारे 1,786 खाटा आता करोना रुग्णांवरील उपचारासाठी महापालिकेस उपलब्ध होणार असून त्यात 929 ऑक्सिजनची सुविधा असलेले, 189 आयसीयू आणि ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा असून 85 व्हेंटिलेटर्सही उपलब्ध होणार आहेत.
ही आहेत 16 रुग्णालये…
इनामदार हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल हॉस्पिटल (येरवडा), रत्ना हॉस्पिटल, शेठ ताराचंद रामनाथ हॉस्पिटल, रूबी हॉल क्लिनिक, संजीवन हॉस्पिटल, एमजेएम हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, रायझिंग मेडिकल हॉस्पिटल, ज्युपिटर लाइफ लाइन हॉस्पिटल, कोलंबिया अशिया हॉस्पिटल (खराडी), श्री क्रिटीकेअर ऍन्ड ट्रॉमा सेंटर, विलू पूनावाला हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल (औंध)
शासकीय दरानेच उपचार…
या रुग्णालयांमध्ये करोनाबाधितांवर शासनाने निश्चित केलेल्या दराने उपचार करावे लागणार आहेत. हा उपचाराचा खर्च रुग्णांना करावा लागणार आहे. त्यासाठी महापालिका कोणताही खर्च देणार नाही. मात्र, खाटा शिल्लक असताना कोणत्याही करोनाबाधितास खाटा नसल्याचे कारण देत उपचारही नाकारता येणार नाही. या शिवाय, रुग्ण दाखल करून घेतानाच, रुग्णालयांना तातडीने पालिकेने विकसित केलेल्या डॅशबोर्डवर एकूण रुग्ण आणि शिल्लक खाटांची माहिती द्यावी लागणार आहे.