लोणावळा – देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अगदी सुरवातीपासून आदिवासी समाज लढला असून, आपले सर्वस्व झोकून देऊन या समाजाने स्वातंत्र्यलढयात आपले योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काढले. लोणावळा शहरात आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या आदिवासी समाज मेळाव्यात त्या बोलत होत्या.
आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेच्या वतीने मंगळवारी (दि.9) आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त लोणावळा शहरात शोभा यात्रेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम, समाज प्रबोधन व्याख्याने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून चित्रा वाघ या उपस्थित होत्या.
यावेळी वाघ म्हणाल्या, मुख्य प्रवाहापासून आजवर वंचित राहिलेल्या आदिवासी समाजाला, आदिवासी महिलांना उज्वला गॅस योजना, शौचालय, स्वतःच घर अशा विविध योजना आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, गुलाबराव म्हाळसकर, माजी, जिल्हा अलका धानिवले, रचना सिनकर, सायली बोत्रे, रॉबर्ट त्रिभुवन, नितीन साबळे, अविनाश ठोंबरे, संजय माने आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी समाज बांधवांच्या जातीच्या दाखल्याचा विषय या मेळाव्यात प्रामुख्याने मांडण्यात आला. हा दाखला मिळवताना येणाऱ्या अडचणी यावेळी जवळपास प्रत्येक वक्त्याने मांडल्या. तसे निवेदन देखील आदिवासी विभागाला देण्यात आले. सरकारकडून हा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.
भर पावसात भव्य शोभायात्रा
लोणावळा शहरात मुसळधार पाऊस पडत असतानाही त्याची तमा न बाळगता आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत आदिवासी समाज बांधवांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ढोल ताशा आणि डी.जे.च्या तालावर आदिवासी तरुण, तरुणींने आपले पारंपरिक नृत्य सादर करीत आपला उत्साह दाखवून दिला. अनेकजण आपल्या पारंपरिक वेशभूषेत आणि वनदेवता असलेल्या वाघोबाच्या वेषात या शोभायात्रेत सहभागी झाले होते.