मॉस्को – करोना विषाणूच्या नियंत्रणासाठीचे वैद्यकीय साहित्य घेऊन रशियाच्या लष्कराचे एक विमान अमेरिकेला रवाना झाले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. या वैद्यकीय साहित्यामध्ये मेडिकल मास्क आणि अन्य वैद्यकीय साहित्याचा समावेश आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. मात्र त्यामध्ये या मदत साहित्याचा अन्य कोणताही तपशील दिला गेलेला नाही.
मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये मॉस्कोजवळ लष्करी तळावरून बुधवारी पहाटे उड्डाण करणारे कार्गो विमान दिसत होते. या विमानात मदत साहित्याचे बॉक्स भरण्यात आलेले होते. या संदर्भात वृत्तसंस्थेने अधिक माहिती विचारली असता रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने काहीही तपशील देण्यास नकार दिला आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर सोमवारी फोनवरून चर्चा केल्यानंतर हे मदत साहित्य पाठवण्यात आले आहे.
रशियाकडून यापूर्वी इटलीलाही अशाच प्रकारे मानवतावादी दृष्टिकोनातून वैद्यकीय साहित्य आणि वैद्यकीय तज्ञ पाठवून दिले आहेत. इबोला आणि स्वाईन फ्लूवरील नियंत्रणाचा अनुभव असलेल्या 100 विषाणू तज्ञांचा त्यात समावेश आहे. सोव्हिएत रशियातून फुटून बाहेर पडलेल्या देशांना, इराण आणि उत्तर कोरियालाही रशियाने करोना टेस्ट किट पाठवून दिली आहेत.
प्रत्यक्ष रशियातील करोनाबाधितांची संख्याही वाढत असून आतापर्यंत 2,337 झाली असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे.