गडकिल्ल्यांबाबत माझ्या बोलण्याचा विपर्यास

उदयनराजे भोसले यांचे स्पष्टीकरण
वाई –
गडकिल्ल्यांबाबत मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्टीकरण उदयनराजे भोसले यांनी आज दिले. निवडणुकांमध्ये चारित्र्यहनन करणे किळसवाणे असून गडकिल्ल्यांवर डान्स बार, बार उघडा, असे म्हणण्याचा विचार मनात येण्यापेक्षा मेलेलं बरं, अशी प्रतिक्रियाही त्यांनी वाई येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

गड, किल्ले ही छत्रपती शिवरायांची आठवण व पराक्रमाची प्रतीके असून त्यांचे संवर्धन व्हावे. याबाबत राज्य शासनानेही नियोजन केले आहे.गडकिल्ल्यांबाबत मी जे वक्तव्य केलेच नाही, त्याचे खापर माझ्यावर फोडण्याचा काहींचा प्रयत्न आहे. गड, किल्ले पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून लोकांना किल्ल्यावर जाता यावे, राहण्याची व्यवस्था असावी यासाठी तेथे काही आवश्‍यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य शासनाने भूमिका मांडली. त्या भूमिकेनुसार गडकिल्ल्यांवर पर्यटकांसाठी निवासाची सोय असावी.

पायथ्याशीही राहण्याची व्यवस्था असावी. गडांवर जाण्यासाठी रोपवे असावेत, अशी भूमिका मी मांडली होती. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मी जे बोललो, ते बोललो. मात्र, मी जे बोललोच नाही त्याचे खापर माझ्यावर फोडले जात आहे. मी काही दिवसांपूर्वी एका दैनिकाला मुलाखत दिली होती. त्यावेळी गडकिल्ल्यांबाबत माझी भूमिका मांडली होती.

जे मी बोललो नाही, त्याचे खापर माझ्यावर फुटणार असेल तर बरोबर नाही. ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी झाल्यास पर्यटनास चालना मिळून रोजगार निर्मिती होईल. मी संकुचित वृत्तीचा नसून निवडणूक आली की माझ्या चारित्र्यहननाचा कट शिजवण्यात येतो, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साताऱ्यात गुरुवारी सभा होत असून जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्‍न त्यांच्यासमोर मांडणार आहे, असे सांगून उदयनराजेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.