मार्च एन्डच्या तोंडावर क्षेत्रीय कार्यालयांत : कामांना मुदतवाढ मिळण्याची मागणी
पुणे – शहरात लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात मात्र ठेकेदार गर्दी करत आहेत. महापालिकेच्या विकासकामांची मुदत 31 मार्च रोजी संपत असल्याने त्यातच करोनामुळे कामे बंद झाली आहेत. त्यामुळे पुढील वर्षात या कामांना मुदतवाढ न मिळाल्यास आर्थिक नुकसानीच्या भीतीने ठेकेदार धास्तावले आहेत.
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालायांनी मार्चअखेरच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात डिसेंबर आणि जानेवारीमध्ये निविदा काढल्या. याची मुदत 31 मार्चपर्यंत होती. तसेच या कामाची बिले 31 मार्चपूर्वी जमा करणे बंधनकारक आहे. तर या वर्षांपासून पालिकेने ही बिले मुख्य खात्यात न स्वीकारता क्षेत्रीय कार्यालयात देण्याच्या सूचना आहेत. मात्र, करोनामुळे 15 मार्चपासूनच शासकीय कामकाजावर निर्बंध आले आहेत.
तर त्याच वेळी शहरात आता पूर्ण संचार बंदी लागू झाली असून बाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे अनेक ठेकेदारांची कामे अर्धवट आहेत. तर त्यांना बिले महापालिकेस देता आलेली नाहीत. त्यामुळे आता या कामासाठी पुढील अंदाजपत्रकात तरतूद नसल्यास ठेकेदारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे बिले मिळवण्यासाठी तसेच कामांना मुदतवाढ मिळावी, म्हणून ठेकेदार रोज क्षेत्रीय कार्यालयात गर्दी करत आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयात गर्दी करू नये असे आदेश असले, तरी ठेकेदारांची मात्र गर्दी कायम आहे.