जयंत कुलकर्णी
वर्षभरात 20 पैकी 7 कमानींची उभारणी : दिशादर्शक फलक गायब; कमानीचा सांगाडाच उभा
नगर – शहरातील रस्त्याची माहिती होण्याच्या उद्देशाने महापालिकेने दहा वर्षाच्या करारावर दिशादर्शक कमानी उभारल्या. परंतु या कमानीतून ठेकेदाराचे उखळ पांढरे होत असल्याचे दिसत आहे. वर्षभरात 20 प्रमुख चौकात या कमानी उभारण्याचे आदेश असतांना ठेकेदाराने केवळ 7 चौकात या कमानी उभारल्या असून अव्वाच्या सव्वा दर आकारून जाहिरातीच्या माध्यमातून ठेकेदार लाखो रुपये कमवित आहे. महापालिकेला मात्र, वर्षाकाठी प्रत्येक कमानीपोटी केवळ 6 हजार मोजत आहे.
दरम्यान, या कमानीवरील दिशादर्शक फलक गायब झाले असून सध्या या कमानींचा सांगाडाच उभा आहे. तत्कालिनी महापौर सुरेखा कदम यांनी नगर शहरात प्रवेश करणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गावर स्वागत कमानी उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता.परंतु या कमानींचा विषया बाजूला पडून शहरात दिशादर्शक फलक असलेल्या कमानीचा विचार पुढे आहे.
वर्षभरात सुमारे 20 प्रमुख चौकात या कमानी उभारण्यास मंजूरी देण्यात आली. त्यानुसार शिरिष लोढा या ठेकेदार संस्थेबरोबर करार करून त्या संस्थेला दहा वर्षासाठी या 20 चौकात कमानी उभारण्याचे काम देण्यात आले. कमानी उभारून या कमानीच्या एका बाजूला दिशादर्शक फलक लावून दुसऱ्या बाजूला या संस्थेने जाहिराती लावून त्यातून उत्पन्न मिळवावे. त्यापोटी महापालिकेला प्रत्येक कमानीपोटी सहा हजार रुपये वर्षकाठी देण्याचे ठरले. या संस्थेने एका वर्षात या 20 चौकांमध्ये कमानी उभारण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु महापालिकेची मर्जी असलेल्या या ठेकेदाराने गेल्या दीड वर्षात केवळ सात चौकात या कमानी उभारल्या आहेत.
त्यात गुलमोहर रस्त्यावर महाराजा हॉटेल, भिस्तबाग चौक, कुष्ठधाम बसथांबा चौक, तोफखाना पोलीस चौकी चौक, प्रोपेसर कॉलनी चौक, पत्रकार चौक व लालटाकी चौक या सात चौकात या कमानी उभारण्यात आल्या आहेत. या सात कमानी उभारून वर्ष लोटले असून अद्यापही या सात कमानीचे ठरल्याप्रमाणे प्रत्येकी 6 हजार रुपये महापालिकेला या ठेकेदार संस्थेने जमा केलेले नाही. अर्थात महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून पैसे जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु तसा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही. मार्केट विभागाकडून मात्र पैसे जमा न झाल्याचे सांगण्यात आले आहे.
या कमानीच्या एका बाजूला दिशादर्शक फलक लावण्यात आले असून दुसऱ्या बाजूला जाहिरातीच्या माध्यमातून ठेकेदार संस्था उत्पन्न मिळवित आहे. या जाहिरातील लावतांना अव्वाच्या सव्वा दर लावण्यात आले आहे. त्याबरोबर या कमानीच्या लोखंडी पत्र्यावर देखील जाहिरातील लावून ठेकेदार आपले उत्पन्न वाढवित आहे. या कमानीच्या माध्यमातून ही संस्था लाखो रुपये मिळवित असतांना महापालिका मात्र हजारो रुपयांवर समाधान मानत आहे.दीड वर्ष झाली तरी अद्यापही उर्वरित कमानी उभारण्यास संस्थेला मुहूर्त सापडला नाही.
महापालिका मात्र याबाबत सावरासावर करीत आहे. वीजेचे खांब व तारामुळे या कमानी उभारता येत नाही. अर्थात या कमानी उभारण्यापूर्वी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून ज्या चौकात कमानी उभारण्यास मंजूरी दिली. तेथील अडचणी व येणाऱ्या समस्या काय आहे, हे न पाहताच कमानी उभारण्यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, बहुतांशी कमानींचा आता सांगाडाच दिसत आहे. त्यावरील दिशादर्शक फलक केव्हाच गायब झाले आहेत.
दहा वर्षांच्या करारावर या चौकात कमानी उभारण्यास संबंधित संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक कमानीपोटी महापालिकेला सहा हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे. शहरात 20 पैकी सात चौकात कमानी उभारल्या आहेत. उर्वरित कमानी उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एम. एस. पारखे,
अभियंता, महापालिका.