पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) खासगी कंत्राटदारांच्या शिवशाही बसेसची तपासणी सुरू केली आहे.वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यामुळे खासगी कंत्राटदाराच्या 80 बसेसची तपासणी केली असून त्यापैकी 3 बसेस अनफिट आढळल्या. या बस तातडीने दुरुस्ती केल्या जाव्यात, अशा सूचना संबंधित कंत्राटदाराला दिल्याचे प्रशासनाने सांगितले.
गेल्या 3 वर्षांत राज्यभरात शिवशाहीचे 550 अपघात झाले असून 51 जणांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीच्या आधारे शिवशाहीची सेवा धोकादायक ठरत असल्याचे दिसून आले. 25 नोव्हेंबरला शिवशाही बस शिंदेवाडीजवळ उलटल्याने दोघांचा बळी गेला होता. यानंतर शिवशाहीची सुरक्षा ऐरणीवर आल्याने महामंडळाने कंत्राटदारांना वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बसमध्ये तांत्रिक बिघाड हे एक प्रमुख कारण दिसून आल्यानेच खासगी शिवशाहींच्या बसेसची तपासणी (सरप्राइज चेक) सुरू केली आहे.