जेवणात अळ्या; मोशी क्वारंटाइन सेंटरमधील पुरवठादाराला 11 हजारांचा दंड
क्वारंटाइन सेंटरमधील किचनची उद्यापासून होणार तपासणी
अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
पिंपरी – करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाइन करताना महापालिका प्रशासनाकडून त्यांच्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने तक्रारी वाढल्या आहेत. मोशी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये काही दिवसांपूर्वी नाश्त्यात अळ्या व केस सापडले होते. येथील क्वारंटाइन सेंटरमधील किचनमध्ये अस्वच्छता आढळून आली. तसेच, येथील अन्न पुरवठादाराकडे परवाना नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने संबंधिताकडून 11 हजार रुपये दंड वसूल केला आहे.
महापालिकेकडून मोशी येथील समाज कल्याण विभागाचे मागासवर्गीय वसतिगृह आणि आकुर्डीतील खासगी महाविद्यालयात क्वारंटाइन सेंटर करण्यात आलेले आहे. संबंधित ठिकाणी करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. मोशीतील क्वारंटाइन सेंटरमध्ये जेवण निकृष्ट दर्जाचे दिले जात असल्याच्या तक्रारी येथे क्वारंटाइन केलेल्या नागरिकांनी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अचानकपणे तपासणी करत ही कारवाई करण्यात आली. आजच्या कारवाईमुळे महापालिकेचे प्रशासन पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून परवाना नसलेल्या ठेकेदाराला काम दिलेच कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मोशीतील क्वारंटाइन सेंटरच्या किचनमध्ये अस्वच्छता आढळून आली आहे. येथे अन्न पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराकडे योग्य परवाना नसल्याचे दिसले आहे. संबंधिताविरूद्ध 11 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. सोमवारपासून (दि. 15) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमधील किचनची तपासणी केली जाणार आहे.
– संजय नारागुडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग.
महापालिकेकडून क्वारंटाईन सेंटरमध्ये पुरेशा सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही केली जात आहे. जेवणाच्या वेळा पाळल्या जायला हव्यात, याबाबत दुमत नाही. तशा सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत. करोना चाचण्या घेणाऱ्या लॅबवर अतिरिक्त ताण पडत असल्याने अहवाल येण्यास विलंब होत आहे.
– संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.