संशोधनासाठी आयुका-विद्यापीठामध्ये करार

विविध प्रकल्पांवर संयुक्‍तपणे काम करणार : विकास व शैक्षणिक कार्यक्रम राबविले जाणार

पुणे – संशोधनाच्या विविध प्रकल्पांवर संयुक्‍तपणे काम करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्‍स (आयुका) या दोन महत्त्वाच्या संस्थांमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. त्याअंतर्गत भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, खगोलभौतिकी, अवकाश विज्ञान, वातावरण विज्ञान, उपकरणशास्त्र, तंत्रज्ञान आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर संशोधनाबरोबरच विकास व शैक्षणिक कार्यक्रम राबविले जाणार आहे.

“आयुका’तर्फे सध्या थर्डी मीटर टेलिस्कोप (टीएमटी), लेसर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी (लिगो), स्केअर किलोमीटर अरे (एस.के.ए.), आदित्य- एल 1 अशा विविध महत्त्वाच्या आणि प्रकल्पांवर काम सुरू आहे. तर पुणे विद्यापीठ हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या प्रकल्पांवर कार्यरत आहे. विद्यापीठाकडे विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांमध्ये अभ्यास-संशोधन करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या रूपाने मोठ्या संख्येने प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे. ही या संस्थांची बलस्थाने संयुक्त संशोधनासाठी उपयुक्त ठरणारी आहेत. या करारांतर्गत विद्यापीठातील भौतिकशास्त्र, वातावरण व अवकाश विज्ञान, तंत्रज्ञान, उपकरण विज्ञान हे विभाग “आयुका’सोबत संयुक्तपणे काम करतील. त्यात प्राध्यापक, संशोधक, पदव्युत्तर विद्यार्थी तसेच, पीएचडीनंतर संशोधन करणारे विद्यार्थी सहभागी असतील. त्यासाठी विद्यापीठ व आयुकाच्या आवारात जागा उपलब्ध करून दिली जाईल.

विद्यापीठात अनेक हुशार व प्रज्ञावान विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी सध्याच्या काळातील आव्हानांवर आधारित अभ्यासक्रम विकसित करणे आवश्‍यक आहे. त्या दृष्टीने या सामंजस्य कराराचा उपयोग होईल. सध्याच्या विज्ञानाच्या दृष्टीने बदलत्या परिस्थितीत अशाप्रकारे संयुक्तपणे काम करण्याची गरज आहे.
– डॉ. नितीन करमळकर कुलगुरू, सावित्रीबाई पुले पुणे विद्यापीठ


विद्यापीठ आणि आयुका यांच्यात गेल्या तीन दशकांमध्ये शैक्षणिक विषयांवर सहकार्य झालेले आहे. आता या सामंजस्य कराराच्या निमित्ताने संशोधनाच्या क्षेत्रात संयुक्तपणे काम करण्यास सुरुवात केली जाणार आहे. भारत हा देश-विदेशातील महत्त्वाच्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी आहे. या परिस्थितीत संशोधन संस्थांनी विद्यापीठासारख्या संस्थांशी सहकार्य करण्याची गरज आहे.
– डॉ. सोमक चौधरी संचालक, आयुका

Leave A Reply

Your email address will not be published.