करोनाला रोखण्यासाठी पालिका सज्ज : मुख्याधिकारी रमाकांत डाके देणार प्रशिक्षण
सुनीता शिंदे
कराड – गत दोन आठवड्यापासून कराड शहरात करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही संख्या शंभरावर गेली आहे. त्यामुळे शहरात वाढत असलेली करोनाची साखळी तोडणे आता अवघड आहे. त्यात वेळ घालवण्यापेक्षा नागरिकांच्या मनातील भिती दूर करून त्यांची माहिती मिळविण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे. त्या दृष्टीकोनातून पुढील आठवड्यापासून शहरात निरंतर सर्व्हेक्षण मोहीम सुरू होणार आहे. यात सहभागी होणाऱ्यांना मुख्याधिकारी रमाकांत डाके स्वत: प्रशिक्षण देणार आहेत.
मार्च महिन्यापासून करोना महामारीने सर्वजण हैराण झाले आहेत. सुरूवातीच्या काळात शहरातील करोनाबाबतची स्थिती चांगली होती. जे रूग्ण सापडले. त्यांची साखळी तयार होऊ नये यासाठी पालिकेने केलेले प्रयत्न प्रभावशाली ठरले. शहराची लोकसंख्या एक लाख आहे. त्यामुळे शहरात करोनाचा प्रसार झाल्यास खूप अवघड परिस्थिती होऊ शकते. याचा विचार करून पालिका स्तरावर ठोस निर्णय घेण्यात आले होते. त्याचाही चांगला फायदा झाला. तालुक्यातील इतर गावांमध्ये करोनाचे बाधितांचे आकडे वाढत होते. मात्र, कराड शहर त्यातून वाचले होते.
दरम्यानच्या काळात लॉकडाऊनला शिथीलता मिळाल्यामुळे शहरात गर्दीचे प्रमाण वाढू लागले. तालुक्यातील इतर गावातील लोकांचा शहरात राबता वाढू लागला. तसेच शहरातील लोकही बाहेरगावी जाऊ लागले. त्यातूनच शहरातही पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढली. प्रत्येक वॉर्डात बाधित रूग्ण सापडत आहेत. त्यामुळेच ही साखळी तोडणे आता अवघड झाले आहे. त्यातच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवार, दि. 1 ऑगस्टपासून संपूर्ण जिल्हा अनलॉक केला आहे. कराड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. यापुढील काळात करोनाची परिस्थिती आणखीनच चिघळणार असून साखळी तोडणे कठीण होणार आहे.
करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करत वेळ घालविण्यापेक्षा त्यावर कोणते उपाय करता येतील. यावर पालिका प्रशासन विचार करत आहे. त्यातूनच मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शहरात निरंतर सर्व्हेक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात करोनाबाबत असणारी भिती दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी काही पथक तयार करण्यात येणार आहेत. पालिका कर्मचाऱ्यांबरोबरच शहरातील सर्व क्षेत्रातील लोकांचा यात समावेश असणार आहे. पथकातील व्यक्तींकडून प्रत्येक घराचा सर्व्हे करून तेथे कोणी आजारी व्यक्ती आहे का याची विचारपूस केली जाणार आहे. त्यातून कोणी आजार सापडल्यास त्याचे तात्काळ स्वॅब घेतले जाणार आहेत. यातून करोनाबाधित व्यक्ती लवकरात लवकर सापडण्यास मदत होणार आहे. त्यातूनच शहरातील बाधितांची संख्याही कमी होण्यास मदत होणार आहे.
शहरात यापूर्वीही करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व्हेक्षण मोहीम राबविण्यात आली आहे. मात्र, डाके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जाणारी मोहीम थोडी वेगळ्या स्वरूपाची असणार आहे. या मोहिमेसाठी स्वत: रमाकांत डाके सर्वांना प्रशिक्षण देणार आहेत. घरी गेल्यानंतर काय माहिती घ्यावी याचे ज्ञान ते देणार आहेत.
सर्वेक्षणातील सहभागासाठी पालिकेचे आवाहन
निरंतर सर्व्हेक्षण मोहिमेत सहभागी होण्यासाठी पालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये पालिका कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी, समाजसेवक, विविध क्षेत्रातील इच्छुक व्यक्ती यांना आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी मंगळवार, दि. 4 ऑगस्टपर्यंत कार्यालय अधिक्षक प्रशांत कांबळे यांच्याकडे नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कराडात करोनामुळे काही नागरिकांचा बळी गेला आहे. योग्य वेळी ते उपचारासाठी पुढे न आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. करोनाची नाहक भिती बाळगून नागरिक पुढे येत नाहीत. त्यांच्या मनातील हीच भिती दूर करून त्यांना करोनामुक्त करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे.
रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कराड नगरपालिका.
—————
असे असेल सर्वेक्षण…
निरंतर सर्व्हेक्षण मोहीम 4 ते 5 महिने चालणार आहे.
पालिका कर्मचाऱ्यांबरोबरच, पदाधिकारी व इतरांचा समावेश.
सर्व्हेक्षणासाठी प्रभागनिहाय पथकांची निर्मिती
आठवड्यातून एकदा घरांना भेटी देणे.
नागरिकांच्या मनातील भिती दूर करणे
आजार व्यक्ती सापडल्यास तात्काळ नोंद करणे.
संबंधित व्यक्तीचे स्वॅब घेणे.
योग्यवेळी उपचार देऊन त्याचा जीव वाचवणे.