पालिकेतील बायोमेट्रिक यंत्रणा होणार सुरू

सामान्य प्रशासन विभागाचे विद्युत विभागाला पत्र

पुणे – स्मार्ट सिटी म्हणून मिरविणाऱ्या पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची हजेरी अजूनही बायोमेट्रिकद्वारे नव्हे, तर रजिस्टरवरच घेतली जात असल्याची बाब दैनिक “प्रभात’ने समोर आणताच; ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी विद्युत विभागास सूचना देऊन तातडीने या मशीन सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.

महापालिकेचे सुमारे साडेसतरा हजार कर्मचारी असून संपूर्ण कारभार मुख्य इमारतीमधून चालतो. या ठिकाणी सुमारे पाच ते साडेपाच हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरीत पारदर्शकता यावी, तसेच कर्मचाऱ्यांकडून कामाच्या वेळेत कार्यालयाबाहेर पडण्याचा प्रकार कमी व्हावा, यासाठी बायोमेट्रिक हजेरी करण्याचा निर्णय 2013 पासून घेण्यात येत आहे. त्याला मूर्त स्वरूप 2015 मध्ये आले. तत्कालिन अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी आधारसंलग्न बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा उभारण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार, प्रत्येक विभागास जवळपास वेळोवेळी कर्मचाऱ्यांची माहिती तसेच हाताचे ठसे देण्यासाठी मुदत देण्यात आली. मात्र, एकाही विभागाने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काही ठराविक विभागांसाठी प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा उभारण्यात आली. त्यासाठी काही मशीन्सही बसविण्यात आल्या. मात्र, आता या मशीन बंद असून त्याची गेल्या दोन वर्षांत देखभाल दुरूस्तीच झालेली नाही. त्यामुळे सर्व विभागांकडून पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची हजेरी रजिस्टरवरच घेण्यात येत आहे. या प्रकारावर दैनिक “प्रभात’ने उजेड टाकताच, सामान्य प्रशासन विभागाने विद्युत विभागाकडे याबाबत चौकशी केली असून या मशीन प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आल्या होत्या. मात्र, त्याची नियमित देखभाल झाली नसल्याने त्या बंद असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यासाठी निधी नसल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे या कामासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून निधी वर्ग करून दिला जाणार असून त्याबाबत विद्युत विभागास कळविण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.