नगर (प्रतिनिधी) – करोना व्हायरसचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. हे संकट मोठे आहे, म्हणून या संकटात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने संपूर्ण राज्यात मोठे मदत कार्य उभारले आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या गुणे आयुर्वेद रुग्णालयात कोविड उपचार सेंटर सुरू करून, रुग्णांना दिलासा दिला आहे. जोपर्यंत महामारी जात नाही, तो पर्यंत सर्वसामान्यांना आधार व मदतकार्य पदाधिकाऱ्यांनी सुरूच ठेवावे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करत आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.
मंत्री पाटील यांनी शनिवारी रात्री आमदार अरुण जगताप यांच्या निवासस्थानी नगरमधील करोनास्थितीचा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला. आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आमदार राहुल जगताप, शहराध्यक्ष माणिक विधाते, डॉ. फाटके, बाळासाहेब जगताप, सुमतिलाल कोठारी, अतुल भंडारी, नाना पांडोळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आ. संग्राम जगताप यांनी नगर शहरात राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या माध्यमातून चालू असलेल्या मदत कार्याची सविस्तर माहिती दिली. ऐंशीव्या वर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार दिवस-रात्र राज्यभर दौरे करून आढावा घेत आहेत. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही काम करत आहोत, असे सांगून राज्य सरकारकडून अजून मदतीची गरज असल्याची मागणी केली.