“लॉकडाऊन’मध्ये औद्योगिक कंपन्या सुरू ठेवा – आमदार लांडगे

विभागीय आयुक्‍त दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्‍तांना निवेदन
पिंपरी (प्रतिनिधी) –करोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी “लॉकडाऊन’ करणे उचित आहे. पण, गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले औद्योगिक क्षेत्राचे अर्थ”चक्र’ पुन्हा लॉकडाउन करून बंद ठेवणे चिंताजनक आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत औद्योगिक कंपन्या सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडे केली आहे.

विभागीय आयुक्‍त दीपक म्हैसेकर यांनी 13 जुलैपासून 10 दिवस कडकडीत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात मार्चअखेरीस लॉकडाऊन सुरू करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले. त्यावर अवलंबून असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसह उद्योगांचे आर्थिक बजेट कोलमडले. तीन महिने उद्योग बंद होते. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील आयटी आणि अन्य तत्सम कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी तणावातून आत्महत्या केल्याच्या घटना समोर आहेत.

आता नव्याने पुन्हा लॉकडाऊन घोषित करून कंपन्या बंद पडल्यास हे चित्र आणखी भयावह होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्‍त व विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी लॉकडाउनमध्ये उद्योग सुरू ठेवण्याबाबत औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

जुलैच्या सुरवातीला उद्योग क्षेत्राचे काम काही प्रमाणात पूर्ववत होत आहे. गावी गेलेले कामगार पुन्हा कंपन्यांमध्ये दाखल होऊ लागले आहेत. उद्योग काही अंशी सुरळीत होईल, अशी अशा असतानाच पुन्हा लॉकडाउन करून 10 दिवस “सक्‍तीचा बंद’ ठेवावा लागेल. परिणामी, लाखो कामगार आणि उद्योजक अडचणीत सापडणार आहेत. यासाठीच उद्योगांना लॉकडाउनमधून वगळावे, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.
सामाईक अंतर (फिजिकल डिस्टंन्सींग) आणि सॅनिटाइझर, मास्क यासह शक्‍य त्या सर्व प्रकारची काळजी घेवून कंपन्यांनी आपले काम सुरू केले आहे. कामगारही अत्यंत गांभीयपूर्वक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत आहेत. मग, लॉकडाउन केला तरी, नियमांचे पालन करुन उद्योग सुरू ठेवण्यास अडचण काय? असा प्रश्‍न लांडगे यांनी उपस्थित केला आहे.

कामगारांचे “बजेट’ पुन्हा कोलमडणार
करोना आणि लॉकडाऊनमुळे अगोदरच कामगारांचे “बजेट’ कोलमोडले होते. जुलैच्या सुरवातीस कंपन्या सुरू झाल्या त्यामुळे कामगारांना आशेचा किरण निर्माण झाला होता. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अनेक अडचणींचा सामना सध्या कामगार करीत आहेत. पण, कंपनी सुरू राहिली, तर काहीसा दिलासा मिळेल, या आशेने कामगार नव्याने सुरुवात करीत आहेत. पण, पुन्हा लॉकडाउन झाल्यामुळे कामगारांवर बेकारीचे कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने कामगार आणि उद्योग यांचा सर्वसमावेशक विचार करुन लॉकडाऊनबाबत भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.