#IPL2019 : मुंबई इंडियन्स समोर तगड्या दिल्लीचे आव्हान

-रोहित विरुद्ध शिखर सामन्याकडे सर्वांचे लक्ष

-युवराज सिंग असणार प्रमुख आकर्षण

-दोन्ही संघांसाठी संघ निवड ठरणार डोकेदुखी

मुंबई – तीन वेळेचा आयपीएल विजेता असलेला मुंबईचा संघ यंदाही चौथ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या उद्दिष्टाने आयपीएलमध्ये उतरणार असून आज मुंबई संघासमोर दिल्ली कॅपिटल्स म्हणजेच गतवर्षीच्या दिल्ली डेअर डेव्हिल्सचे आव्हान असणार आहे.

मागील हंगामात मुंबईच्या संघाने निराशाजनक कामगिरी केल्यानंतर यंदा संघात अनेक बदल केले आहेत. त्यात भारताचा मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग यंदा मुंबईच्या संघात दाखल झाला असून युवराजच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

तर, दुसरीकडे पूर्वीचा दिल्ली डेअर डेव्हिल्सचा संघ आता दिल्ली कॅपिटल्सच्या नावाने ओळखला जात असून यंदाच्या हंगामातही संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे असणार आहे. गत वर्षी हंगामाच्या मध्येच कर्णधार गौतम गंभीरने आपले कर्णधारपद श्रेयसकडे सोपवून सामने न खेळण्याच्या घेतलेल्या निर्णयाने बराच गोंधळ उडाला होता. मात्र, त्यानंतर संघाच्या कामगिरीत बराच फरक पडला असून यंदाही हा संघ सर्व नवोदित खेळाडूंसह मैदानात उतरलेला दिसून येत आहे.

मुंबई इंडियन्स Vs दिल्ली कॅपिटल्स

वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – वानखेडे मैदान, मुंबई

मुंबई इंडियन्सने 2013, 2015 आणि 2017 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. मात्र, आयपीएलच्या मागच्या मोसमात मुंबईच्या संघाला अपेक्षित कामगिरी करता न आल्याने त्यांना साखळी फेरीतच गारद व्हावे लागले होते. मात्र, या मोसमात मुंबई इंडियन्स विजेतेपद पटकावण्याच्या इर्ष्येने मैदानात उतरणार आहेत. संघात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशनसारखे फलंदाज आहेत.

तर, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, पोलार्ड सारखे सामने फिरवणारे अष्टपैलू खेळाडू आहेत. तर, बुमराह, मलिंगा, मिशेल मॅक्‍लेनघन सारखे गोलंदाज आहेत. त्यातच यंदाच्या मोसमात युवराज सिंगदेखील मुंबई इंडियन्सकडून खेळणार असल्यामुळे संघाची ताकद आणखी वाढली आहे. मात्र, पहिल्या सहा सामन्यांसाठी मलिंगा संघासाठी उपलब्ध नसल्याने संघासमोर अडचणी वाढल्या असून ऍडम मिल्ने देखील टाचेच्या दुखापतीतून सावरला नसल्याने मुंबई समोर पहिल्याच सामन्यात गोलंदाजांसंदर्भात अडचणी वाढल्या आहेत.

त्यातच विश्‍वचषक स्पर्धेसाठी बुमराह हा टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे तो कमी सामने खेळणार असल्याची दाट शक्‍यता आहे. अशा स्थितीत मुंबई इंडियन्सला पर्यायी गोलंदाजाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. तर, अनुभवी फिरकीपटू नसल्याचा फटका मुंबई इंडियन्सला सहन करावा लागू शकतो. सध्या तरी कागदावर मुंबई इंडियन्सचा संघ तगडा असला तरी मैदानावरील कामगिरीवरच विजेतेपदाची वाटचाल अवलंबून असणार आहे.

दुसरीकडे दिल्ली संघाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. दिल्ली संघाने यंदा आपल्या नावात बदल केला असून सपोर्ट स्टाफमध्येही बदल केले आहेत. त्यामुळे नाव बदलामुळे संघाच्या कामगिरीत सुधारणा होईल का, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. मागील वर्षी दिल्ली संघात गौतम गंभीरचे पुनरागमन झाले होते. गंभीरच्या समावेशामुळे दिल्लीचा संघ आपली छाप पाडेल अशी अपेक्षा होती. मात्र, दिल्लीला सातत्याने अपयशाला सामोरे जावे लागले.

पराभवामुळे गंभीरने कर्णधारपद सोडल्यामुळे मुंबईकर असलेल्या श्रेयस अय्यरच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली. अखेरच्या काही सामन्यात दिल्ली डेअर डेव्हिल्सने कडवी झुंज दिली. मात्र त्यांचे आव्हान आधीच संपुष्टात आले होते. मागील मोसमात दिल्लीला 14 पैकी अवघ्या पाच सामन्यात विजय मिळवता आला.

दिल्ली कॅपिटल्सकडे शिखर धवन, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ यासारखे धडाकेबाज फलंदाज असून कर्णधार श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारीसारखे खेळाडू आहेत. त्यामुळे दिल्लीची फलंदाजी सध्या तरी तगडी आहे. तर गोलंदाजीमध्ये कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, बंडारू अयप्पा आणि इशांत शर्मासारखे गोलंदाज संघाकडे आहेत. अनुभवी अमित मिश्राकडे फिरकी आक्रमणाची धुरा असणार आहे. तर, नेपाळचा सुनील लामिच्छानेदेखील आपल्या गोलंदाजी चमक दाखवण्यास उत्सुक आहे.

प्रतिस्पर्धी संघमुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरॉन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्‍लेनघन, ऍडम मिल्ने, जेसन बेहरनडॉर्फ, बरिंदर सरन, युवराज सिंग, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, पंकज जासवाल, राशिख सलाम.

दिल्ली कॅपिटल्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन ऋषभ पंत, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलीन मुनरो, कगिसो रबाडा, संदीप लामिचाने आणि ट्रेंट बोल्ट, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बॅंस, नाथू सिंह, कॉलिंग इंग्राम, शरफेन रदरफोर्ड, किमो पाउल, जलज सक्‍सेना, बंडारु अय्यप्पा.

Leave A Reply

Your email address will not be published.