Sanjay Shirsath | जानेवारी महिन्यात खडकवासला येथील शासकीय वसतीगृहात विद्यार्थिनींना पोटदुखी, मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याची घटना घडली होती. हे वसतीगृह समाजकल्याण आयुक्तालयांच्या अंतर्गत येते. येथील १० ते १२ विद्यार्थिनींना हा त्रास झाला होता. यानंतर या विद्यार्थिनींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. दूषित पाण्यामुळे विद्यार्थिनींना हा त्रास झाल्याची तक्रार वसतिगृह प्रशासनाकडे करण्यात आली होती. याविषयी जलशुद्धीकरण यंत्राच्या तपासणीनंतर यंत्रामध्ये कोणताही बिघाड नसल्याचा खुलासा विधिमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आला आहे.
खडकवासला येथील वसतिगृह समाज कल्याण विभागाच्या आयुक्तालयाअंतर्गत येते. दूषित पाण्यामुळे येथे शिकणाऱ्या काही विद्यार्थिंनीला पोटदुखी, मळमळ अंगावर खाज आणि पुरळ येणे हा प्रकार घडला होता. त्याबाबतची माहिती विधापरिषदेत आमदार योगेश टिळेकर यांनी तारांकित प्रश्नोत्तरावेळी विचारली. त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर समाजकल्याण आणि न्याय खात्याच्या मंत्र्यांनी उत्तर दिले आहे.
वसतिगृहातील विद्यार्थिनींनी वसतिगृह प्रशासनाकडे तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणती खबरदारी घेण्यात आली तसेच या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई झाली असे प्रश्न विधानपरिषदेचे आमदार योगेश टीळेकरांनी विचारले होते.
यंत्रात बिघाडच नाही; मग कारवाई करण्याचा प्रश्नच नाही
या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री संजय शिरसाठ यांनी वसतिगृहातील जलशुद्धीकरण यंत्राची तपासणी केली असता, यंत्रामध्ये कोणताही बिघाड आढळून आला नाही अशी माहिती दिली. तसेच विद्यार्थिंनीना स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरठा करण्याची कार्यवाही वसतिगृह स्तरावर करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही, असे देखील शिरसाठ यांनी सांगितले.