Nashik Crime News : कर्नाटकातील चोरली घाट परिसरात तब्बल 400 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून याचप्रकरणात नाशिकमधील संदीप पाटील या व्यक्तीला अपहरण करुन, मारहाण करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. याप्रकरणात पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विशेष तपास पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर रक्कम मुंबई-ठाणे परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाची असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. माहितीनुसार, चारशे कोटी रुपयांच्या जून्या नोटांनी भरलेला कंटेनर लुटल्याच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह, कर्नाटक आणि गोवा राज्यात खळबळ उडाली आहे. नाशिक (Nashik )ग्रामीण पोलीसांकडे संदीप पाटील या तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनूसार, 16 ऑक्टोबर 2025 ला गोव्यातून कर्नाटकला जाणारे पैशांनी भरलेले कंटेनर चोरली घाटात लुटण्यात आले होते. गोवा राज्यातून कर्नाटकातील एका देवस्थानासाठी नेण्यात येत असलेल्या या जुन्या दोन हजार रुपयांच्या नोटांनी भरलेल्या कंटेनरमध्ये सुमारे 400 कोटी रुपयांची रोकड होती, असा बनाव रचून ही रक्कम लंपास केल्याचा संशय आहे. ही घटना सुमारे दीड ते दोन महिन्यांपूर्वी घडल्याचे सांगण्यात येत आहे. ही रक्कम कर्नाटकातील चोरली घाटात कंटेनर चोरीला गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. Nashik Crime News या आरोपाच्या आधारे संदीप पाटील याचे अपहरण करून अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. अपहरणादरम्यान आपल्याला बेदम मारहाण करण्यात आली, तसेच स्वतःसह कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात काही व्यावसायिकांसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा धक्कादायक दावा त्यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन धायगुडे (मुंबई) या पाच जणांना अटक केली आहे. काल विराट गांधी याला अटक करण्यात आली असून, अद्याप दोन आरोपी फरार आहेत. या प्रकरणात राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. तपासात आणखी मोठी नावे उघड होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.