यंदा दिवाळी अंकांच्या अर्थकारणाला “संसर्ग’

छपाई, वितरण, विक्री यांचे गणित जुळवताना होणार दमछाक


“ई-एडिशन’, “ऑडिओ बुक्‍स’ आदींचा पर्याय 

पुणे – दसरा झाल्यानंतर नागरिकांना दिवाळीचे वेध लागतात. आजही अनेकजण “बौद्धिक खुराक’ म्हणून आवर्जुन दिवाळी अंकाचे वाचन करतात. मागील काही वर्षांपासून दिवाळी अंकाची “ई-एडिशन’देखील प्रकाशित होत आहे. मात्र, यंदा करोनामुळे दिवाळी अंकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. 

सुमारे शंभरहून अधिक वर्षांची दिवाळी अंकांची परंपरा आहे. कविता, लेख, कथा आदी विविध साहित्य प्रकारांतील लेखन वाचता येत असल्याने “पट्टीच्या वाचकां’साठी ही पर्वणी असते. लेखन साहित्याबाबतची मते, वाचकांची घटती संख्या, छपाईचा खर्च आदींमुळे दिवाळी अंकांच्या प्रक्रियेत अनेक चढ-उतार आले. मात्र, प्रकाशकांनी तग धरला असून, आजही दिवाळी अंकांचे प्रकाशन करण्यात येते. त्यात “ई-एडिशन’, “ऑडिओ बुक्‍स’ आदीचा पर्याय स्वीकारल्याने त्याचे कोठेही आणि केव्हाही वाचन करता येते.

परंतु, यंदा करोनामुळे दिवाळी अंक प्रकाशनातील अडचणी वाढत आहेत. दिवाळीपूर्वी असणाऱ्या करोनाची स्थितीनुसार अंकांची छपाई, वितरण, विक्री आदी गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे अनेक पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. दिवाळी अंकांशी संबंधित सर्व घटकांनी विचार विनिमय करून अशा परिस्थितीत मार्ग काढला पाहिजे, असे मत तज्ज्ञ व्यक्‍त करतात.

दिवाळी अंकाबाबत ऑनलाइन अधिवेशन
दिवाळी अंकांनी महाराष्ट्राचे वैचारिक भरणपोषण केले. समृद्ध आणि संपन्न परंपरा खंडित होऊ नये यासाठी अनेक संपादकांनी आपले बळ एकवटून, जीव धोक्‍यात घालून, आर्थिक तोट्याची तयारी ठेवून दिवाळी अंक प्रकाशित करण्याचे ठरवले. ही बाब दिलासादायक आहे. यंदा दिवाळी अंकांचे नेहमीच अडचणीत असणारे अर्थकारण मोठ्या संकटात सापडले आहे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

दिवाळी अंक संपादक, प्रकाशक, लेखक, वाचक आदींचे पहिले ऑनलाइन अधिवेशन “दिवा प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित केले होते. यावेळी मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, विजय पाध्ये यांसह विविध मासिक, दिवाळी अंकाच्या संपादक, प्रकाशक आदी उपस्थित होते. दरम्यान झालेल्या चर्चासत्रात तज्ज्ञ सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.