सौ. चेतना केरूरे; म्हसवड पालिकेत दाखवले हात धुण्याचे प्रात्यक्षिक
म्हसवड – करोना विषाणू संसंर्गामुळे न्यूमोनियासारखी लक्षणे असलेला आजार होत आहे. या रोगाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी कॉल सेंटर अथवा जवळच्या रुग्णालयाशी तातडीने संपर्क साधावा. योग्य तपासण्या करून घ्याव्यात, असे अवाहन म्हसवड पालिकेच्या मुख्याधिकारी सौ. चेतना केरूरे यांनी केले. करोना विषाणू संक्रमणापासून बचावासाठी उपाययोजना व खबरदारी या संदर्भात शहरातील डॉक्टर, पालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक म्हसवड पालिकेच्या सभागृहात आज घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
नगराध्यक्ष तुषार वीरकर, नगरसेवक गणेश, केशव कारंडे, अखिल काझी, धनाजी माने, विकास गोंजारी, डॉ. वसंत मासाळ, डॉ. राजेद्र मोडासे, डॉ. खाडे, डॉ. दोलताडे, डॉ. कारंडे, डॉ. फुटाणे, डॉ. नरेंद्र पिसे उपस्थित होते. सौ. केरूरे म्हणाल्या, नागरिकांनी आपले हात वेळोवेळी साबणाने व हॅंडवॉशने स्वच्छ धुवावेत. सर्दी व फ्ल्यूसारखी लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळावा. शिंकताना व खोकताना नाकावर व तोंडावर रुमाल धरावा. जंगली अथवा पाळीव प्राण्यांचा संपर्क
टाळावा.
म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. मयुरी शेळके म्हणाल्या, करोनाबद्दल अनेक समज, गैरसमज आहेत. त्यात सोशल मीडियावरून अफवा पसरवल्या जात आहेत. नागरिकांनी या आजाराला घाबरण्याचे कारण नाही. कोणाला ताप, सर्दी खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याने त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून आवश्यक तपासण्या व उपचार करून घ्यावेत. विशेषत: करोनाबाधित क्षेत्रातून आलेल्यांनी तातडीने नजिकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे म्हणाले, करोना विषयी व्हॉटस्ऍप, फेसबुक व अन्य सोशल मीडियावरून अफवा पसरवल्या जात आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी घाबरून न जाता या आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी.