नॉट रिचेबल कंपन्यांमुळे ग्राहक वैतागले

पूर्व हवेलीत मोबाइल सेवा ठप्प : दैनंदिन संवादांवर मर्यादेचे बंधन

सोरतापवाडी – पूर्व हवेलीतील कदमवाकस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, थेऊर, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाची, नायगाव, पेठ, उरुळी कांचन आदी गावांमध्ये मोबाइल सेवेचा बोऱ्या वाजला आहे. ग्राहकांची “असून अडचण, नसून खोळंबा’ अशी परिस्थिती झाली आहे. याबाबत अनेक गावातील नागरिकांनी तक्रार केली असुन मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या याकडे बिनधास्त दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

पूर्व हवेलीतील बहुतांश गावांत मोबाइल सेवा पुरविणाऱ्या बहुचर्चित कंपन्यामध्ये आयडिया, एअरटेल, व्होडाफोन, जीओचा समावेश आहे. प्रत्येक गावात या कंपन्या जाहिरातबाजी करून 4 जी सेवा देत असल्याचे सांगतात. परंतु ग्रामीण भागात 2 जीची पण रेंज उपलब्ध होत नसल्याचे ग्राहक सांगत आहेत. त्यामुळे संपर्क साधने अवघड होत आहेत. या कंपनीच्या परस्पर ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याच्या स्पर्धेमुळे वेगवेगळ्या योजना बाजारात आणून ग्राहकांना आकर्षित
केले आहे.

प्रत्येक घरात कमीत कमी तीन ते चार मोबाइल वापरले जातात. यावरून या कंपन्याना हजारो ग्राहक मिळाले आहेत. या ग्राहकांना तत्पर सेवा पुरविणे प्राध्यानक्रम असताना रेंज नसल्यामुळे ग्राहकाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. मोबाइल सेवा विस्कळीत झाली आहे. याची दाखल कुठलीही मोबाइल कंपनी घेताना दिसत नाही. पूर्व हवेलीत अनेक टॉवर असून अचानक लाईट गेली तरी टॉवरजवळ असणारे जनरेटर देखील सुरू नसतात. त्यामुळे बॅटरी सुरू राहत नाही. परिणामी टॉवर बंद पडत आहे. सर्व सेवा विस्कळीत होत आहे.

इंनटरनेट सेवा वारवार खंडीत होणे, बोलताना मध्येच संभाषण थांबणे, आदी समस्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कदमवाकस्ती हद्दीतील बॅंक ऑफ इंडियाचे नेट कित्येक दिवस बंद असल्याने बॅंकेचे व्यवहार बंद होते. रस्त्याचे काम सुरू असताना एक केबल तुटली होती. ती जोडण्यासाठी मोबाइल कंपनीला कित्येक दिवस लागले, ही संतापाची गोष्ट असल्याचे ग्राहकांनी सांगितले.

कोणतीच मोबाइल कंपनी ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्यात तत्परता दाखवत नाहीत. त्यामुळे संपर्क करणे अवघड होत आहे, ही एक प्रकारची सशुल्क सेवा असल्याने ग्राहकांचे समाधान होणे आवश्‍यक आहे. कोट्यवधी रुपयांचा व्यापार करून मोबाइल कंपन्या फायदा मिळवण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. परंतु सेवा पुरविण्यात कंपन्या मागे राहत आहेत. त्यामुळे ग्राहकाला योग्यसेवा मिळेल, याची व्यवस्था करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

मोबाइल कंपन्या “रिचार्ज’च्या नावाखाली पैसे उकळत असून मात्र, त्या पट्टीत सेवा देत नाहीत. त्यामुळे रुग्ण, विद्यार्थी, नोकरदार, सामान्य नागरिक यांचे हाल झाले आहेत.कंपन्यांनी लवकरच सेवा पूर्ववत करून नागरिकांचे होणारे हाल टाळावेत.
– माऊली माथेफोड, रहिवासी, आळंदी म्हातोबाची.

 

Leave A Reply

Your email address will not be published.