ग्राहक वस्तू उत्पादक आशावादी; उत्सवात खरेदी वाढण्याची शक्‍यता वाढली

नवी दिल्ली – गेल्या दीड वर्षापासून भारतातील ग्राहक खरेदी टाळत आहेत. त्यामुळे कंपन्यांची इन्व्हेंटरी वाढली आहे. आता उत्सवाच्या काळामध्ये विक्री वाढण्याची शक्‍यता ग्राहक वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांना वाटते. त्यामुळे या कंपन्यांनी वितरकाकडे बऱ्याच वस्तू पाठविल्या असल्याचे दिसून येते.

महागाई वाढत आहे, त्याचबरोबर कच्च्या मालाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे बऱ्याच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. मात्र तरीही उत्सवाच्या काळामध्ये खरेदी किमान दहा टक्‍क्‍यांनी वाढेल असे बऱ्याच ग्राहक वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना वाटते. कच्चा माल महागल्यामुळे गेल्या वर्षांमध्ये या कंपन्यांनी दोन वेळा दरवाढ केली आहे.

दसऱ्यापासून दिवाळी संपेपर्यंत भारतामध्ये ग्राहक खरेदी करीत असतात. वर्षाच्या पूर्ण विक्रीपैकी 30 टक्के विक्री या उत्सवाच्या काळात केली जाते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्याचबरोबर वाहतुकीवरील निर्बंध पूर्णपणे संपुष्टात आले आहेत. त्यामुळे या वस्तूचा पुरवठयामध्ये कसलाही प्रश्न निर्माण होणार नाही असे पॅनासोनिक, एलजी, हेलर, गोदरेज अप्लायन्सेस या कंपन्यांनी सांगितले.

बऱ्याच कंपन्यांनी नवी उत्पादने सादर करण्याबरोबरच आक्रमक प्रचार मोहीम सुरू केली आहे. त्याचबरोबर बॅंका आणि इतर वित्तीय संस्थांच्या मदतीने बरीच वित्तीय उत्पादने उपलब्ध केली आहेत. त्यामुळे सुरुवातीला कमीत कमी रक्कम भरून ग्राहकांना आपल्या वस्तू घरी घेऊन जाता येतील.

दीड वर्षापासून ग्राहकांनी फारशी खरेदी केलेले नाही. त्याचबरोबर प्रवास, पर्यटन, हॉटेलिंग यासारख्या क्षेत्रावर खर्च झालेला नाही. त्यामुळे बचत झालेली रक्कम ग्राहक वस्तू विकत घेण्यात वापरतील अशी अशा बऱ्याच कंपन्यांनी व्यक्त केली आहे. ऑगस्ट महिन्यातच आमच्या विक्रीत 25 टक्के वाढ झाली आहे. आगामी काळात त्यात भर पडेल असे पॅनासोनीक इंडिया या कंपनीचे अध्यक्ष मनीष शर्मा यांनी सांगितले.

गोदरेज अप्लायन्सेसचे उपाध्यक्ष कमल नंदी यांनी सांगितले की, बऱ्याच ग्राहकांनी लसीचा डोस घेतलेला आहे. मात्र काही ग्राहक करोनाची तिसरी लाट येईल अशी शंका बाळगून आहेत. मात्र आम्ही विक्री 20 टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल याची तयारी करून ठेवली आहे.

गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यामध्ये विक्री पूर्णपणे ठप्प झाली होती. दुसऱ्या सहा महिन्यांमध्ये थोडीफार विक्री वाढली आहे. मात्र ती अजूनही करोनापूर्व काळावर गेलेली नाही. त्यामुळे यावेळी विक्री वाढेल अशी आशा आहे, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.