पिंपरी : महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट पद्धतीने करण्यात आली असून विधानसभेच्या आचारसंहितेपासून अजूनही सर्व कामकाज बंद आहे तसेच ऑनलाइन पद्धतीने काम सुरू होण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्यातील २६ लाख बांधकाम कामगारांचे अर्ज तात्काळ निकाली काढावेत या व विविध मागण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये बांधकाम कामगारांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिली .
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महासंघतर्फे राष्ट्र सेवा दल पुणे येथील सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या प्रमुख प्रतिनिधीची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूर आंदोलनाचा ठरावासह इतर ठरावही मंजूर करण्यात आले .
यावेळी साथी सागर तायडे, कॉ. शंकर पुजारी, कामगार नेते काशिनाथ नखाते,नवी मुंबईच्या विनिता बाळेकुंद्री, वर्धाचे प्रशांत रामटेके, यवतमाळचे रत्नदीप डोके,अकोल्याचे परशुराम मेश्राम, नांदेडचे परमेश्वर मठपती सोलापूरचे प्रदीप परकाळे, कोल्हापूरचे राजू सुतार,बीडच्या अनिता जाधव,बुलढाण्याचे चांद शाहा, लातूरचे विजय जाधव यांचे सह विविध प्रतिनिधी उपस्थित होते. प्रस्तावना सागर तायडे यांनी तर आभार राजेश माने यांनी मानले.
काय आहेत मागण्या?
बांधकाम कामगारांची नोंदणीबाबत शासन आणि महामंडळ जाणीव जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून बांधकाम कामगार योजनेच्या केवळ जाहिराती केल्या जात आहेत प्रत्यक्षात लाभ मात्र मिळत नाही. दिवाळीला बोनस जाहीर केला आणि प्रसिद्धी मिळवली मात्र प्रत्यक्ष कामगारांना काहीच मिळालेले नाही आता बोनस देण्यात यावा. विविध योजना या पूर्णतः थंडावल्या असून नोंदणी व नूतनीकरण न झाल्याने दरम्यानच्या कालावधीत कामगारांचा अपघाती मृत्यू झाला तर याला महामंडळ आणि शासन जबाबदार असेल. महाराष्ट्र राज्यातील नोंदणी कामे तालुक्याला केंद्र निर्माण केलेले असून सदरच्या ठिकाणातून किरकोळ प्रमाणात नोंदणी होणार आणि पिळवणूक होणार असून प्रत्येक जिल्ह्यातील कामगारांची संख्या पाहिली असता नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी खुल्या पद्धतीने होणे अत्यंत गरजेचे आहे. असे न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. विविध जिल्हा प्रतिनिधींनी आपल्या समस्या यावेळी मांडल्या.