पुणे -महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम, कामगार कल्याणकारी मंडळाने विशेष नोंदणी अभियानात 2018-19 साली नोंद केलेल्या बांधकाम कामगारांना त्यांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी किमान 10 हजार रुपये जमा करुन मिळावेत आणि त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाउनची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढविण्यात आली आहे. या काळात काम बंद असल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची आर्थिक स्थिती खूप बिकट झाली आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशावेळेस कामगार कल्याणकारी मंडळाने 2018-19 मध्ये नोंद केलेल्या बांधकाम कामगारांच्या बॅंक खात्यात राज्य सरकारकडून दहा हजार रुपये जमा करावेत आणि त्यांना दिलासा द्यावा, असे मोहन जोशी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
बांधकाम कामगार नोंदणी आणि नूतनीकरणाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने डिसेंबर 2019मध्ये करण्यात आली. त्या प्रक्रियेत तांत्रिक कारणांनी अडचणी आल्या. त्यामुळे काहींची नोंदणी झालेली नाही. अशांनाही सरकारने लाभ द्यावेत. तसेच मार्च 2018 पासून नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांच्या बॅंक खात्यात लवकरात लवकर रक्कम जमा करावी. त्याबाबतची कार्यवाही आपण तातडीने कराल अशी अपेक्षा आहे, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.