सातारा-जावळी मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प लागणार मार्गी

सातारा  – सातारकरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या कास धरणाची उंची वाढवण्याचे काम रखडले आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण व्हावा, तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करावी. छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाच्या इमारतीचे काम पूर्ण करून हे संग्रहालय जनतेसाठी खुले करावे.

परळी-सज्जनगड रोप वे करावा, या मागण्यांसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे झालेल्या बैठकीत आवाज उठवला होता. त्यामुळे ना. पवार यांनी आ. शिवेंद्रराजेंच्या सर्व मागण्या मान्य करून कास धरणासाठी 18 कोटी निधी तातडीने मंजूर केला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय व इतर कामांसाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे विभागातील जिल्हा नियोजन समित्यांच्या आराखड्यांचा आढावा ना. अजित पवार यांनी नुकताच पुणे येथे घेतला. सातारा जिल्ह्यासाठी झालेल्या बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे, विभागीय आयुक्‍त दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्ह्यातील आमदार, आणि अधिकारी उपस्थित होते.

कास धरणाची उंची वाढवण्याच्या कामासाठी महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानांतर्गत उर्वरित 18 कोटी रुपये अनुदान तातडीने नगरपरिषदेस वितरीत करावे आणि सुधारीत प्रकल्प अहवालानुसार 42 कोटी रुपयांची वाढीव रक्‍कम पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करावी, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी केली. या कामासाठी ना. पवार यांनी 18 कोटी रुपयांचा तातडीचा निधी मंजूर केला.

किल्ले सज्जनगडावर दासनवमी, रामनवमीबरोबर वर्षभरात भाविक, पर्यटक येतात. त्यात वयोवृद्ध भाविकांची संख्या जास्त आहे. त्यांच्यासाठी परळी-सज्जनगड रोप वे सुरू करण्याचा प्रस्ताव पर्यटन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी तातडीने मंजूर करावा. सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीतील फर्निचर, रंगकाम व इतर कामे निधीअभावी रखडलेली आहेत.

सुसज्ज वास्तू संग्रहालय जनतेसाठी तातडीने खुले व्हावे, यासाठी उर्वरित कामांसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी केली. या दोन्ही कामांसाठी निधीची तरतूद करण्याची सूचना ना. पवार यांनी अधिकाऱ्यांना दिली. सातारा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या जागेचा प्रश्‍न सुटेल तेव्हा सुटेल; परंतु तोपर्यंत जिल्हा रुग्णालयात तात्पुरते मेडिकल कॉलेज सुरू करण्याची मागणी आपण केली होती. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी पदनिश्‍चिती आणि पदनिर्मितीस मंजुरी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात कॉलेज सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील तरुणांना प्रथम वर्षात प्रवेश घेण्याबाबत प्रक्रिया सुरु करावी, अशी मागणीही आ. शिवेंद्रराजे यांनी केली.

येत्या शैक्षणिक वर्षापासून सातारच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचे शिक्षण सुरू करण्यासाठी ना. पवार यांनी सकारात्मकता दर्शवली. याशिवाय सातारा येथील देगाव येथे एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यासाठी उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घ्यावी, या मागणीलाही ना. पवार यांनी सकारात्मकता दर्शवली. या मागण्यांबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांना निवेदन दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.