नवी दिल्ली – अगोदरच घर कर्जावरील व्याजदर जास्त असताना रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी आपल्या रेपो दरात पुन्हा 0.25% वाढ केली आहे. त्यामुळे घरांचे व्याजदर आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत घरांच्या मागणीवर परिणाम होण्याची शक्यता बांधकाम क्षेत्राने व्यक्त केले आहे.
महाग घराच्या मागणीवर फारसा परिणाम होणार नाही. मात्र मध्यम आणि कमी खर्चाच्या घराच्या मागणीवर परिणाम होणार असल्याचे बऱ्याच विकसकांनी नमूद केले. आता रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर वाढ थांबवावी आणि तसेच स्पष्ट संकेत द्यावे म्हणजे घर बांधणी क्षेत्राला एक निश्चित दिशा मिळू शकेल असे मत व्यक्त करण्यात आले.
क्रेडाई या विकासाच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पटोडिया म्हणाले की, रिझर्व्ह बॅंकेने मे महिन्यापासून अनेक वेळा व्याजदर वाढ केली आहे. त्यामुळे घराच्या निर्मितीबरोबरच खरेदीवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत पुढे व्याजदर वाढ होणार नाही असे संकेत रिझर्व्ह बॅंकेने दिल्यास त्याचा या क्षेत्राला उपयोग होऊ शकतो.
नरडॅको या संस्थेचे उपाध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले की, आतापर्यंत रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात अडीच टक्के वाढ केली आहे आणि ती पुरेशी आहे. त्याचा बांधकाम क्षेत्रावर बराच परिणाम झाला आहे.
मे महिन्यापासून आतापर्यंत झालेली व्याजदर वाढ पाहता विकासाकांना घराच्या किमतीत काही प्रमाणात वाढ करावी लागण्याची शक्यता आहे. घरासाठीचे व्याजदर आता साडेनऊ टक्क्यांच्या पुढे जाऊ शकतात. त्यामुळे एक तर ग्राहकांच्या घराचा हप्ता वाढतो किंवा कर्ज परत फेडीची काल मर्यादा वाढते. मात्र करोनाच्या काळात घर खरेदी थंडावली होती. त्यामुळे आगामी काळातील घर विक्रीवर फारसा परिणाम होणार नाही असे काही विकासाना वाटते.
RBI On Adani Group : “बॅंकिंग व्यवस्थेवर…” अदानी समूहातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर RBIचे स्पष्टीकरण
गेल्या काही महिन्यांपासून भारतातील घर विक्री वेगाने वाढत असल्याची आकडेवारी जाहीर होत आहे. त्याचबरोबर घरांची निर्मिती ही वाढली आहे. दरम्यानच्या काळात महागाई जास्त असल्यामुळे कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत आतापर्यंत विकासाकांनी घरांच्या किमती जास्त प्रमाणात वाढविणे टाळले होते. मात्र आगामी काळात घराच्या किमतीत वाढ होण्याची भीती काही विकसकांनी व्यक्त केली.