सुरक्षा साधनांशिवाय ‘वायसीएम’च्या इमारतीचे बांधकाम

मजुरांचा जीव धोक्‍यात : चौथ्या मजल्यावर धोकादायक पद्धतीने काम 

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे काम सुरु असून, ठेकेदाराकडून मजुरांना कोणतीही सुरक्षा साधने पुरविली जात नाहीत. त्यामुळे महापालिकेची अवस्था दिव्याखाली अंधार अशी झाली आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे विस्ताराचे व विकसनाचे काम सुरु असून ते प्रगतीपथावर आहे. हे बांधकाम जुन्या इमारतीवर सुरु आहे. मात्र हे बांधकाम करण्यात येत असताना काम करणाऱ्या बांधकाम मजुरांना ठेकेदाराने कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने पुरविली नाहीत. करोनानंतर काम मिळाल्याने हे मजूर जीव धोक्‍यात टाकून रोजंदारीसाठी धोकादायक पद्धतीने काम करत आहेत. चौथ्या मजल्यावर धोकादायक पद्धतीने काम सुरु असल्याचे छायाचित्र पुराव्यादाखल रयत विद्यार्थी विचार मंचने महापालिका प्रशासनाला सादर केले आहे.

सुरक्षा साधनाशिवाय काम करत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कामगारांना सेफ्टी बूट, सेफ्टी हेल्मेट, हातमोजे पुरविलेले नाहीत. काम करताना या कामगारांना कोणत्याही प्रकारची दुखापत अथवा जीवित हानी झाल्यास संपूर्ण जबाबदारी महापालिकेची असेल, कोणताही मजूर सुरक्षा साधनांअभावी जीवित हानी झाल्यास या ठेकेदारासह महापालिकेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्‍तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

या ठेकेदारावर कारवाई करुन, सर्व मजुरांना सुरक्षा साधने पुरवण्यात यावेत. तसेच सर्व मजुरांचे जीवन विमा काढण्यात यावा अशी मागणी या निवेदनात केली आहे. या निवेदनावर धम्मराज साळवे व संतोष शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.