भारताचे संविधान!

26 नोव्हेंबर1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधानाला यावर्षी 70 वर्ष पूर्ण होत आहे. गेली सत्तर वर्ष देशाला एकसंध ठेवण्याचे काम संविधानाने केले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही संविधानामुळेच जिवंत आहे. संविधान हा भारताचा राष्ट्रीय धर्मग्रंथ आहे. देशाचे अखंडत्व संविधानामुळेच टिकून आहे.

स्वातंत्र्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, समतेचा हक्क, सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क हे मूलभूत हक्क संविधानाने नागरिकांना बहाल केले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रीय प्रतीकांचा मान राखणे, संविधानाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे, देशाचे सार्वभौमत्व कायम राखणे, देशाचे अखंडत्व कायम राखणे, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणे हे मूलभूत कर्तव्येही संविधानात दिली आहेत. आपल्या हक्कांसोबत आपल्या कर्तव्याचीही जाणीव करून देणारी व जगातील सर्वात मोठे असणाऱ्या भारतीय संविधानाच्या निर्मितीचा इतिहास देखील जाणून घ्यायला हवा.

9 डिसेंबर 1946 ला घटना समितीचे कामकाज सुरू झाले. 11 डिसेंबर 1946 ला डॉ राजेंद्रप्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. घटना समितीचे सल्लागार बी एन राव हे होते. पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल गोविंद वल्लभ पंत, मौलाना आझाद, डॉ बाबासाहेब आंबेडकर, एस आर जयकर, सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता, राजकुमारी अमृता कौर यांचा मान्यवर सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता. घटना समितीच्या तब्बल 114 बैठका झाल्या होत्या. घटना समितीने 11 उपसमित्या देखील नेमल्या होत्या. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1947 रोजी स्वीकारण्यात आला.

4 नोव्हेंबर 1947 रोजी भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीने कच्चा मसुदा तयार करून तो चर्चा विनिमयासाठी सभागृहात ठेवला त्यावर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतकी प्रदीर्घ चर्चा झाली. संविधानसभेने मसुदा समितीवर एकूण 7 सदस्य नियुक्त केले होते. त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष तर ए के स्वामी अय्यर, के एस मुन्शी, गोपाल अय्यंगार, एम माधवराव, मोहम्मद सादुल्ला, आणि डी सी खेतान हे इतर सदस्य होते. त्यापैकी एका सदस्याचे निधन झाले होते. एक सदस्य अमेरीकेत निघून गेले होते. एकाने राजीनामा दिला होता. एक सदस्य राजकारणात व्यस्त होते. त्यामुळे संविधानाचा मसुदा तयार करण्याची सारी जबाबदारी डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर आली त्यांनी ही जबाबदारी अत्यंत निष्ठेने, तन्मयतेने पार पाडली आणि एकट्यानेच संपूर्ण संविधानाचा मसुदा तयार करुन नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती व घटना समितीचे अध्यक्ष डॉ राजेंद्रप्रसाद यांच्याकडे सुपूर्द केला.

24 जानेवारी 1949 रोजी संविधानाची अंतिम बैठक होऊन 26 जानेवारी 1949 पासून भारताचे संविधान अमलात आले. भारत एक सार्वभौम, प्रजासत्ताक राज्य बनले म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. संविधान निर्मितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. जगातील विविध देशांतील संविधानाचा अभ्यास करुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसमावेशक अशी भारताची राज्यघटना तयार केली म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते.

-श्‍याम बसप्पा ठाणेदार

Leave A Reply

Your email address will not be published.