दैनिक प्रभातचे प्रतिनिधी ओंकार दळवी यांचा पुरस्काराने गौरव
जामखेड (प्रतिनिधी) – प्रजासत्ताक दिनानिमित्त जामखेड शहरात ‘संविधान महोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला असून यानिमित्ताने शहरातून मोटारसायकल रॅली, सुप्रसिद्ध संतोष मोरे यांचा क्रांतिकारी जलसा तसेच विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी दैनिक प्रभातचे तालुका प्रतिनिधी ओंकार दळवी यांना पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सालाबादप्रमाणे यावर्षी जामखेड शहरात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजारातळ येथे संविधान महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी दहा वाजता जामखेड शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. सकाळी ११.३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर व भारतीय संविधानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्लन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुलें, उद्योगपती रमेश आजबे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. डॉ.अरुण जाधव, मधुकर सदाफुले, प्रवीण बोलभट, नगरसेवक मोहन पवार, अमित जाधव, बापूसाहेब गायकवाड, विकी गायकवाड, मुकुंद घायतडक, रवी सोनवणे, अक्षय घायतडक, प्रमोद सदाफुले, सचिन सदाफुले, सुशील सदाफुले, अक्षय गायकवाड, दादा घायतडक, भूषण सदाफुले, युवा नेते मयूर सदाफुले, भिमसैनिक उपस्थित होते.
यावेळी प्रेरणा अमोल सोनवणे व अनन्या सनी सदाफुले या चिमुकल्यांनी भारतीय संविधानामुळे आपल्या देशातील सर्व सामान्य, उपेक्षित समाजाला जगण्याचा अधिकार मिळाला असून आज आपण सर्व जन सुखसोईयुक्त जीवन जगत आहोत. संविधानामुळे आज आमच्या अंगावर कपडे आहेत. आम्ही सोन्याचा घास खात आहोत. सर्व क्षेत्रामध्ये स्वाभिमानाने जीवन जगत आहोत, असे भाषण सादर करुन उपस्थितांची मने जिंकले.
यावेळी पत्रकार ओंकार दळवी, नासिर सय्यद, लक्ष्मण सदाफुले यांना मान्यवरांच्या हस्ते पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संतोष मोरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी जलसा कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी आयोजक व सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले यांनी आभार मानले.