संविधानदिन : आज संसदेची संयुक्‍त बैठक

कॉंग्रेससह शिवसेना बैठकीवर बहिष्कार ?

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली काही विरोधी पक्षांकडून मंगळवारी संविधान दिनानिमित्त संसदेच्या संयुक्त बैठकीवर बहिष्कार टाकला जाण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रातील राजकीय घटनाक्रमाविरोधात ते निदर्शने करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कॉंग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रवादी, तृणमूल कॉंग्रेस, आरजेडी, टीडीपी आणि द्रमुककडून महाराष्ट्रातील राजकीय घटनाक्रम तसेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिल्याविरोधात निदर्शने करणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. ही निदर्शने संसद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संयुक्तपणे करण्यात येणार असल्याचेही म्हटले जात आहे.

विरोधी पक्ष सकाळी संयुक्त बैठकही घेतील आणि संविधान दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीविरोधात विरोधकांची एकजुटता दाखवण्याचा हेतू आहे. भाजपचा पूर्वीचा सहकारी पक्ष शिवसेनाही या विरोधात भाग घेईल. शिवसेनेचे नेते अनिल देसाई, अरविंद सावंत आणि इतर काही नेत्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

संविधान स्वीकारुन 70 वर्षे झाल्यानिमित्त संसदेच्या केंद्रीय कक्षात मंगळवारी संविधान दिवस साजरा केला जाणार आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदारांना संबोधित करतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.