“अंबानींविषयी सहानुभूती वाटावी म्हणून त्यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवण्याचं षडयंत्र”

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाजवळ स्फोटक भरलेली गाडी आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अंबानी यांच्या ‘अॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ स्फोटकं असलेली गाडी उभी करण्यात आली होती. गाडीत जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या होत्या. या घटनेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच हे षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे.

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे शेतकरी आणि सामान्यांवर लादले आहेत. अन्नधान्याचा व्यापार दहा वीस लोकांच्या हातात जाणार आहे. या कायद्याचे अदानी आणि अंबानी हे दोनच लाभधारक असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. या दोघांपैकी एक असलेल्या अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं सापडतात कसे, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध मागील तीन महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या कायद्यांचा लाभ अंबानी यांना होणार आहे. त्यामुळे अंबानी यांच्याविषयी जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे. हा रोष कमी करून त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करण्यासाठी स्फोटकं त्यांच्या घरासमोर ठेवण्याचं षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला. तसेच अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं येतात, मग गुप्तचर यंत्रणा, पोलिस, रॉ काय काय करत होते, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. या संदर्भात उत्तर द्यावं, तसेच सीबीआयने राजकीय कामापेक्षा याकडे लक्ष द्यावं अशी मागणी करताना स्फोटकांमुळे अदानी-अंबानींना सहानुभूती मिळेल अस काही समजू नये, असंही शेट्टी यांनी नमूद केलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.